बारामती: काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्यांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामतीत ते बोलत होते.
पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या विषयात लक्ष घालून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिकडे गेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री गिरीश महाजन हे काम करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेसुद्धा सातत्याने माहिती घेत आहेत. तेथील मुख्यमंत्र्यांशी बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत, त्यात बर्यापैकी यश आले आहे. काही लोकांना रेल्वे, विमानाद्वारे परत आणले जात आहे. आत्ताच मी एकाशी व्हिडीओ कॉलद्वारे बोललो, जे अडकले आहेत, ते सुखरूप परतत आहेत.
देशवासीयांच्या या हल्ल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानला जरब बसावी, बदला घेतला पाहिजे, असे काहींचे म्हणणे आहे. निष्पाप लोकांना संपविण्याचे क्रूर काम अतिरेक्यांनी केले आहे. केंद्र सरकारने त्यात लक्ष घातले आहे. या दुर्घटनेत भारत एकजुटीने उभा आहे, असे चित्र जगामध्ये गेले. जगातील अनेक देशांच्या प्रमुखांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. अतिरेकी कारवाया करणार्यांना जागा दाखवण्याची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील यंत्रणा अलर्ट : मंत्री भरणे
काश्मीरमधील हल्ल्यात निष्पापांना जीव गमवावा लागला, याचे तीव्र दुःख आहे, दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बीमोड करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने स्वतः पंतप्रधानांनी बैठक घेत सूचना दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार अतिरेक्यांवर कडक कारवाई करेल.
भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी केंद्र, राज्य सरकारचे प्रयत्न राहतील. या घटनेनंतर राज्यातील सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. राज्यातील किती लोक अडकलेत, याचा आकडा निश्चित नाही. परंतु, बारामती दूध संघाचे संचालक मंडळसुद्धा अडकले आहे. जे कोणी अडकले असतील, त्यांना पुढील दोन दिवसांत राज्यात आणले जाईल. उपमुख्यमंत्री पवार यांनी ना. मोहोळ यांच्याशी संपर्क केला असल्याचे ना. दत्तात्रय भरणे यांनी बारामतीत सांगितले.