वाल्हे: मे महिन्यातील मान्सूनपूर्व पावसामुळे पुरंदर तालुक्यातील दौंडज खिंड परिसरातील बंधारे भरून ओसंडून वाहत होते. ओढे-नाले, पाझर तलाव आणि साखळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने, सध्या ऐन पावसाळ्यात हेच बंधारे कोरडेठाक पडले असून, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
दौंडज खिंड, पिंगोरी, कवडेवाडी, जेजुरीसह कडेपठार खोर्यात मे महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भूगर्भजल पातळी वाढली होती. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेले खोलीकरण, तसेच सुमारे 20 साखळी बंधारे व पाझर तलाव भरल्यामुळे खरीप हंगामात पिकांना दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु जूनपासूनच पावसाचा ओघ थांबल्याने खरीप हंगामातील पिकांना आता पावसाची नितांत गरज भासू लागली आहे.
बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, चवळी, हुलगा, घेवडा, वाटाणा यांसह विविध कडधान्यांची पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरळीत झाल्यानंतर खुरपणीपर्यंत हंगाम समाधानकारक होता. परंतु गेल्या आठवड्यात थोडाफार रिमझिम पाऊस पडून पुन्हा उन्हाचा चटका वाढल्याने जिरायती भागातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.
पालखी महामार्गालगतच्या दौंडज खिंड परिसरात ऐन उन्हाळ्यात पाण्याने ओसंडून वाहणारे बंधारे आता पावसाळ्याच्या मध्यावर येऊनही कोरडेठाक पडल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने अशीच उघडीप ठेवली, तर खरीप हंगामावर गंभीर संकट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.