

सोमेश्वरनगर: सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात शेतातून जाणार्या महावितरणच्या वीजवाहक तारांमुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. आमच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल महावितरणच्या अधिकार्यांना सोमेश्वरनगर परिसरातील शेतकर्यांनी केला आहे.
सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 शेतकर्यांनी गुरुवारी (दि.28) महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांची भेट घेत संताप व्यक्त केला. अंभोरे यांनी शेतकर्यांचे निवेदन स्वीकारत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. (Latest Pune News)
शेतातून जाणार्या वीजवाहक तारांना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झोळ पडले आहेत. हवेच्या दाबाने तारांचे घर्षण होऊन आग लागण्याच्या घटना घडत असून, त्यातून पिके जळून खाक होत आहेत. महावितरण नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हजारो एकर ऊस लागवड केली जाते. शेकडो एकर ऊस हा प्रत्येक हंगामामध्ये वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे जळीत होऊन शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. रोहित्रात स्पार्किंग होऊन शेतकर्याचे आर्थिक नुकसान होते आहे. एखाद्याचा जीव गमवावा लागला तर त्याला कोण जबाबदार? असा सवाल या वेळी करण्यात आला. यापुढील काळात अशा घटना घडल्या तर महावितरणच्या अधिकार्यांना जबाबदार धरू असा इशारा शेतकर्यांनी दिला.
या वेळी सोमेश्वरचे माजी संचालक सोमनाथ सोरटे, शहाजीराव जगताप, सागर गायकवाड, निलेश गायकवाड, शिवाजी शेंडकर, संभाजी करचे, सोमनाथ मगर, दत्तात्रय राजवडे, संजय चव्हाण, नामदेव शेंडकर यांच्यासह वाणेवाडी, करंजे, करंजेपूल, निंबूत, सोरटेवाडी, मगरवाडी, चोपडज, होळ, मुरूम, येथील शेतकरी उपस्थित होते.
महावितरणने तारांचे झोळ काढावेत, नुकसान झाल्यास शेतक?यांनी त्वरीत भरपाई द्यावी, अन्यथा अधिकार्यांना घेराव घालू, असा इशारा ऋषिकेश गायकवाड यांनी दिला.