शिवाजी शिंदे
प्रगत तंत्रज्ञानामुळे पदांवर येतेय गंडांतर
शिपाई, लिपिक या पदासह काही अभियंत्यांची पदे होणार कमी
कोणती पदे कमी करायची याचा संबंधित कार्यालयाकडून घेतला जाणार आढावा
काही पदे खासगीकरणाच्या माध्यमातून तात्पुरती भरण्यावर राहणार भर
लवकरच देणार अंतिम रूप
पुणे : राज्याच्या जलसंपदा विभागात आता नको असणारी पदे कमी करण्यासाठी शासकीयस्तरावर आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू असून, या आकृतीबंधामुळे अनेक पदांवर गंडांतर येणार आहे. विशेषत: शिपाई, लिपिक तसेच काही अभियंता श्रेणीत समाविष्ठ असलेल्या पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात गरज भासली तरच तात्पुरती पदे भरण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी नवा आकृतीबंध तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (Latest Pune News)
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागात मागील काही वर्षापासून वाढलेले संगणकीकरण, तसेच आधुनिक तंत्रज्ञान याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. विशेषत: आरेखक या पदांसाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर मागणी होती. त्यासाठी विशिष्ठ शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त असलेल्या कर्मचार्यांची गरज भासायची. मात्र, मागील काही वर्षापासून ‘अॅटो कॅड’च्या माध्यमातून नकाशा तयार करण्याचे काम काही वेळातच होते. त्यामुळे या विभागातील पदांची संख्या आपोआपच कमी होणार आहे. शिपाई, कनिष्ठ लिपिक, अभियंतादेखील कमी होणार आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे या पदांची गरज राहिली नाही. त्यामुळे या पदांवर गंडांतर येणार आहे.
याशिवाय यांत्रिकी विभागातील बहुतांशी पदे कमी करण्यावर भर राहणार आहे. असे असले तरी पुढील काळात काही पदे वाढविण्यावरदेखील भर राहणार आहे. त्यामध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी ‘कालवा निरीक्षक’ ही पदे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे हे एक अतिशय अवघड काम आहे. त्यासाठी या पदांची संख्या वाढू शकते.
जलसंपदा विभागातील बहुतांशी कामे ‘बाह्यस्त्रोत’ (आऊटसोर्सिंग ) कडून करून घेण्यावर भर राहिला आहे. त्यामुळे ‘नको’ असलेली पदे कायमचीच कमी करण्यासाठी आकृतीबंधामध्ये प्राधन्यता देण्यात येणार आहे. या आकृतीबंधाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
आकृतीबंधामध्ये कोणती पदे कमी करायची याबाबत राज्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयाकडून माहिती घेण्यात येणार आहे. त्यानुसार किती कोणती पदे कमी करायची यावर विचारविनिमय झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल. दरम्यान, आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यास अंतिम रूप देण्यात येणार आहे.