महाळुंगे पडवळ: डिंभे धरणाच्या डावा कालव्यातून निघालेल्या घोड शाखेला मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे दहा गावांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील लौकी, कळंब, थोरांदळे, जाधववाडी, खडकी, वळती आदी सुमारे दहा गावे व वाड्यावस्त्यां मधील पिकांना पाण्याची नितांत गरज होती. घोडे शाखेतून पाणी सोडावे यासाठी शेतकर्यांनी आंदोलन केले होते. (Latest Pune News)
भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम व जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांनी कालव्याच्या पाण्यात उडी मारून केलेले आंदोलन चर्चेत राहिले. पाणी सोडले जात नसल्याने शेकडो शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कालवा समितीच्या बैठकीत केलेल्या आवाहनानंतर पाच मे रोजी घोड शाखेला पाणी सोडण्यात आले. पाण्यामुळे टंचाई भासत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांना भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच पिकांना जीवदान मिळाले आहे. ऊस, द्राक्ष, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक आदी पिकांना पाण्याचा लाभ झाला आहे.
लौकी गावातील प्रयोगशील शेतकरी संतोष थोरात म्हणाले, यंदाच्या उन्हाळी हंगामातील हे शेवटचे आवर्तन ठरण्याची शक्यता आहे. याबाबत स्पष्ट माहिती कुकडी पाटबंधारे विभागाने दिलेली नाही. आंदोलनानंतर पाणी उपलब्ध झाले आहे.
कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव उपकार्यकारी अभियंता दत्ता कोकणे म्हणाले, सुमारे 18 दिवस घोड शाखेला पाणी राहील. शेतकर्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पाणीपट्टी वेळेत भरावी.