पुणे

सोलापूरसाठी उजनीतून सोडले पाणी; धरणकाठावरील शेतकरी चिंतेत

Laxman Dhenge

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्यासह भीमा नदीवर अवलंबून असणार्‍या सोलापूर जिल्ह्यासह इतर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी (दि. 10) सकाळी 9 वाजता 1500 क्यूसेकने उजनी (यशवंत सागर) धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता तीन हजार, तर अडीच वाजता साडेचार हजार क्युसेकने, तर सायंकाळी सहा हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. यामुळे सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी उजनीवर अवलंबून असणार्‍या इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

उजनी धरणात सध्या वजा 44 टक्के पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्याला पिण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना बसणार आहे. दौंड तालुक्यात भीमा नदी कोरडी पडली आहे. तर इंदापूर तालुक्यात धरणातील पाणी झपाट्याने कमी कमी होत आहे. शेतकरी पिके जगवण्यासाठी पाईप जोडण्याच्या खर्चाने मेटाकुटीला आला आहे. नदीचे पाणी खोल गेल्याने पर्यायी म्हणून जेसीबी पोकलेनच्या साह्याने चर खोदून त्यामध्ये मोटरीने पाणी आणून तेथून पुढे पाईप लाईनद्वारे शेतापर्यंत नेले जात आहे. त्यातच जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

सोलापूरसाठी दहा ते बारा दिवस धरणाच्या गाळमोर्‍यातून पाणी सोडल्यानंतर धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होणार आहे. यंदा लवकर पावसाला सुरुवात न झाल्यास ऊस पिकासह केळी, फळबागा व इतर पिकेदेखील हातची जाण्याची शक्यता आहे. इंदापूरसह बारामतीतील औद्योगिक वसाहतींनादेखील उजनीचे पाणी दिले जाते. तसेच अनेक गावच्या पाणी योजना उजनीवर अवलंबून आहेत. त्या आता बंद पडल्या आहेत. उजनी काठच्या गावातील नागरिक पिण्याचे पाणी तर मागील अनेक वर्षांपासून विकतचे घेऊन पीत आहेत. कारण पाण्याला येणारी दुर्गंधी, गढुळ तसेच शेवाळयुक्त पाणी यामुळे या भागातील नागरिक हे पाणी पीत नाहीत. सदर पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवालदेखील अनेकदा देण्यात आला आहे.

उजनी धरणाची सध्याची पाणीपातळी

  • एकूण पाणीपातळी – 486.875 मीटर
  • एकूण पाणीसाठा 39. 72 टी.एम.सी.
  • टक्केवारी – वजा 44 . 69 टक्के
  • बाष्पीभवन- वजा 7. 77 मि.मी.
  • मसीना-माढाफ योजना : बंद
  • दहिगाव योजना : बंद
  • मुख्य कालवा : बंद
  • वीजनिर्मतिी – बंद
  • भीमा नदीत विसर्ग – 6000 क्युसेक

नेते मंडळी गप्प

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील राजकीय नेते मंडळी राजकारणात व्यस्त असून, ते मात्र यावर भाष्य करण्यास तयार नाहीत. तसेच शेतकरी संघटनादेखील गप्प आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT