पुणे

जेजुरीत चार दिवसांतून एकदा पाणी; महिलांचा ‘हंडा मोर्चा’चा इशारा

Laxman Dhenge

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात चार दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यामुळे जेजुरीकरांवर पाण्याच्या शोधात भटकण्याची वेळ आली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पिण्याचा पाणीपुरवठा न झाल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा महिलावर्गाने दिला आहे. जेजुरी शहराला नाझरे धरण आणि मांडकी डोहातून पिण्याच्या पाण्याची योजना आहे. नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडल्याने या योजनेतून जेजुरीला पाणी बंद झाले आहे. तातडीची पाणी योजना असणार्‍या मांडकी डोहावरील योजना गेली तीन ते चार वर्षे नादुरुस्त होती.

सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात ही योजना दुरुस्त करण्यात आली आहे. जेजुरीला दररोज पाणी देण्यासाठी 60 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. गेले वर्षभर 4 दिवसांआड पिण्याचे पाणी नगरपालिकेकडून पुरविले जात होते. मात्र, एक महिन्यापासून पाण्याचे वेळापत्रक कोलमडून गेल्याने पाण्यासाठी नागरिक हैराण झाले आहेत. सध्या जेजुरी पाणीपुरवठा केंद्रापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने मांडकी डोहावरून आलेली जलवाहिनी फुटली असून, पाणीपुरवठा होत नसल्याचे नगरपालिकेकडून सांगितले जात आहे. गेले 8 ते 10 दिवस तीव्र पाणीटंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यासाठी जेजुरीकरांना वणवण फिरावे लागत आहे. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरही उपलब्ध होत नाहीत तसेच नागरिकांना जारचे पाणी दररोज विकत घ्यावे लागत आहे. नगरपालिका प्रशासनाला पाण्याचे नियोजन करता आले नसल्याने पाणीटंचाईचे संकट कोसळल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मांडकी डोह योजना सुरू झाल्यानंतर दोन दिवसांआड पाणी दिले जाईल, ही घोषणा कागदावरच राहिली असून, पुढील काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होणार आहे.

नाझरे धरणातील पाणी संपुष्टात आल्याने मांडकी डोह योजनेतील पाणी सध्या पिण्यासाठी दिले जात आहे. शहराला 60 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून, मांडकी योजनेतून केवळ 18 ते 20 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. त्यामुळे नियोजन करून 4 दिवसांआड पाणी दिले जाते. त्यातच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या आठवड्यात दोन ते तीन वेळा जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. जलवाहिन्यांची दुरुस्ती केली असून, येणार्‍या पाण्यातून टाक्या भरल्या जात आहेत. 4 दिवसांआड पाणी दिले जाणार आहे.

– प्रसाद जगताप, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, जेजुरी नगरपालिका

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT