Water cut if no meter installed PMC notice
पुणे: पुणे शहराची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाणी पुरवताना मोठी गळती होत आहे. ही गळती रोखण्याच्या सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकत्याच दिल्या होत्या.
त्यानंतर पालिकेला जाग आली असून, पाणीगळती रोखण्यासाठी आता समान पाणीपुरवठाअंतर्गत बसविण्यात येणारे एमएमआर मीटर नळजोडला सक्तीने बसविण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत. याला नागरिकांनी किंवा राजकीय व्यक्तींनी विरोध केल्यास त्यांच्यावरथेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. (Latest Pune News)
पुणे महापालिकेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
तसेच वापरण्यात येणार्या पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही, तसेच पाण्याची मोठी गळती होत असल्याने पाणी वाया जात असल्याचे सांगत ही गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशदेखील त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते.
गळती रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करून पाणी मीटर बसविणे आवश्यक असल्याचेदेखील ते म्हणाले होते. यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी शुक्रवारी परिपत्रक काढत पाणी मीटर सक्तीने बसविण्याचे आदेश दिले आहेत.
पाणीगळती शोधण्यासाठी वॉटर ऑडिट करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसविणे आवश्यक आहे. त्यानुसार मीटर बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील एक महिन्यामध्ये पुणे शहरातील उर्वरित 100 टक्के एएमआर मीटर बसविण्याचे नियोजन आहे.
मिळकतकरातील पाणीपट्टीपेक्षा मीटरने पाण्याचे बिल कमी येणार!
महापालिका सध्या मिळकतकरामध्ये निवासी ग्राहकांकडून वार्षिक 900 रुपये आकारणी करते. मीटरद्वारे पाणीपुरवठा करताना एक हजार लिटरसाठी 8 रुपये दर असेल. प्रत्यक्षात शुद्धीकरण आणि पुरवठा यंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रशासनाचा 25 रुपये खर्च होतो. पाण्याचा योग्य वापर करून वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी योजना महत्त्व पूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी आतापर्यंत या योजनेला सहकार्य केले आहे. यापुढील काळातही सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
...अन्यथा गुन्हे दाखल होणार!
महापालिकेमार्फत मीटर बसविण्यात येणार असून, त्यासाठी सहकार्य करावे. मीटर बसविण्यासाठी विरोध करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पाणी नळजोड बंद करणे अथवा कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा थेट इशारा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी दिला आहे.
77 हजार मीटर बसविण्याचे काम बाकी
महापालिकेने केलेल्या ग्राहक सर्वेक्षणानुसार आता 2 लाख 63 हजारपैकी 1 लाख 85 हजार मीटर बसविण्यात आले आहेत. तर राहिलेले 77 हजार मीटर बसविण्याचे काम बाकी आहे. मीटर बसविण्यासाठी मुख्य कंपनीने 5 ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक ठेकेदाराने महिन्याभरात पंधरा हजार मीटर बसवावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली.
इथे पाणी मीटरला विरोध
कोथरूड, धनकवडी, कात्रज, मध्यवर्ती पेठांचा भाग, कसबा पेठ, ससाणेनगर, येरवड्यातील आंबेडकरनगर, कोंढवा, महंमदवाडी, मार्केट यार्ड.
पाणीपुरवठ्याच्या 141 झोनपैकी 40 झोनचे काम पूर्ण झाले आहे. या झोनमधील पाण्याचे मोजमाप सुरू करण्यात येत आहे. यापैकी 11 झोनमधील 6 झोनमधील अतिरिक्त पाण्याचा वापर 20 टक्क्यांच्या खाली आला आहे. शहरात चाळीस टक्के पाणीगळती होते. ती न रोखल्यास भविष्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.- नंदकुमार जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, मनपा.