पुणे

सोनवडी बंधार्‍यातून पाण्याची गळती; गळती थांबण्याची शेतकर्‍यांची मागणी

Laxman Dhenge

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला ते सोनवडी (ता. दौंड) यादरम्यानच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती सुरू आहे. गळती त्वरित थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे भीमा आणि घोड नदी या दोन नद्यांचा संगम आहे. येथील बंधार्‍यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून पाणीगळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सांगवी दुमाला, गणेगाव दुमाला, नानवीज, गार, कानगाव, मांडवगण फराटा आणि तांदळी या गावांना पाणीपुरवठा करणारा हा बंधारा आहे.

कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यातील पाणी अनेक शेतकर्‍यांनी पाइपलाइनद्वारे शेतात नेले आहे. पाणीगळती अशीच राहिली तर उन्हाळ्यामध्ये शेतातील पिके जळून जाण्याची शक्यता आहे. अजून दोन महिने पाणी पुरले तर शेतीतील पिके जगतील. संबंधित ठेकेदाराने बंधार्‍याला ढापे टाकताना निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने पाणीगळती होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने ऊस, कांदा, कलिंगड, खरबूज, द्राक्ष, डाळिंब तसेच चारापिके जळून जाण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. पाटबंधारे खात्याने लवकरच बंधार्‍याची दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी, अशी मागणी शेतकरी ऋषी निंबाळकर यांनी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT