शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूरमधील 12 दुष्काळी गावांच्या पाणीप्रश्नासाठी केंदूर (ता. शिरूर) येथे मागील पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. याबाबत माजी सभापती प्रकाश पवार, राष्ट्रवादी आंबेगाव-शिरूरचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी (दि. 25) रात्री उशिरा आंदोलकांची भेट घेतली. या वेळी आंदोलकांचे वतीने सविस्तर माहिती केंदूरचे माजी उपसरपंच भरत साकोरे यांनी मांडली. यावर वळसे-पाटील यांनी सविस्तरपणे उपस्थितांशी चर्चा करताना सांगितले की, 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी आणि मराठा-धनगर आरक्षणाच्या आंदोलनामुळे पाटबंधारे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून व्यस्त होते.
संबंधित बातम्या :
त्यांना 12 गावांच्या पाणीप्रश्नाबाबतची सविस्तर माहिती दिली असून, केवळ बैठकच होणे बाकी आहे. याशिवाय राज्य शासनाला राज्यभरातील पाणीस्थितीचा आढावा व सल्ला देणा-या नाशिक येथील एमडब्ल्यूआरआरए व वेब कॉस्ट या दोन्ही संस्थांकडे आपला प्रश्न सर्व्हेक्षणासाठी दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे या दोन्ही संस्था, पाटबंधारे विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, स्वत: पाटबंधारेमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंदोलक कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक आपण येत्या काही दिवसांतच मुंबईत घेऊन सदर प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. या वेळी अशोक पऱ्हाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर आंदोलकांपैकी धामारीचे संपत कापरे, कान्हुर-मेसाईचे दादा खर्डे, पाबळचे सोपान जाधव, केंदूरचे भरत साकोरे, सुरेश गावडे, सरपंच सचिन वाबळे, सोपान पुंडे, अर्जुन भगत, प्रमोद पऱ्हाड, दौलत पऱ्हाड, बन्सीराम पऱ्हाड आदींनी वळसे पाटील यांच्याशी पाणी आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली.