नानगाव: मुसळधार पावसाचा सर्वात मोठा परिणाम दौंड तालुक्यातील पारगाव सा. मा. येथील काही कुटुंब आणि व्यापार्यांवर होताना दिसून येत आहे. पावसाचे पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पावसाचे पाणी वाहून येणार्या भागातील नैसर्गिक स्रोत सुरू करावेत. रस्त्याच्या बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठी बंदिस्त गटारे करावीत, अशी मागणी पुढे येत आहे.
मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी पारगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी पहावयास मिळाले. हे पाणी रस्त्यालगतच्या दुकानांसह नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी तसेच प्रवासी, वाहनचालक यांना या पावसाच्या पाण्याचा मोठा फटाका बसला. (Latest Pune News)
मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला की परिसरातील शेतातील आणि उताराचे पाणी वेगाने रस्त्यावर, बाजारपेठेत आणि घरात शिरते. यामुळे सर्वांचीच तारांबळ उडते. घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच अशा कुटुंबाची परिस्थिती अवघड बनते.
तसेच रस्त्यावर पाणी साठल्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच जेष्ठ नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या त्रासापासून पारगावकरांची कधी सुटका होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उंचवट्यामुळे रस्त्यावर साठतेय पावसाचे पाणी
पारगावातील बाजारपेठ वाढल्याने मुख्य बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिक दुकाने, घरे व इतर काही गोष्टी वाढत गेल्या तसेच प्रत्येकाने आपापल्या बांधकामासमोर मुरुम टाकून उंचवटा केला. त्यामुळे सध्याचा रस्ता हा खाली गेल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठते. यात भर म्हणजे पूर्वीचे पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्रोत मात्र बंद पडल्यानेच परिसरातील दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पारगाव सा.मा. येथील न्हावरा - शिरूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी अंतर्गत गटारे केली. मात्र, यावर झाकणे टाकली नसून त्यामधून पाणी जात नाही तसेच या भागातील पाणी निचर्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले आहेत. शेतातील पाणी, रस्त्यावरील पाणी घरात शिरते आहे.-अतुल टिळेकर, ग्रामस्थ.
तळवाडी परिसरातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर तसेच रेणकाईचा माथा, शाळा परिसर या भागातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येते. हे पाणी थेट व्यापारी गाळ्यांमध्ये शिरून नुकसान होत आहे.-महेश धोत्रे, व्यावसायिक.