Water Tanker Pudhari
पुणे

Pune Water Crisis: पंचतारांकित हॉटेल, उपाहारगृहांना टँकरचा आधार; दररोज लागते हजारो लिटर पाणी

टँकर लॉबी तेजीत

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: मान्सूनने ओढ दिल्याने लागू केलेल्या पाणीकपातीमुळे घरगुती वापरासाठी पाण्याचे नियोजन करावे लागत असतानाच शहरातील हॉटेल व्यवसायालाही या संकटाचा मोठा फटका बसत आहे.

पाणीसंकटावर मात करण्यासाठी अनेक मोठ्या आणि मध्यम हॉटेलांनी टँकरचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, वाढती ग्राहक संख्या आणि दररोजची हजारो लिटर पाण्याची गरज यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर नवीन आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.

हॉटेल उद्योग हा पाणी वापरणाऱ्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक मानला जातो. पर्यटकांसोबतच खोल्यांची संख्या, रेस्टॉरंटची क्षमता आणि उपलब्ध सुविधा यानुसार पाण्याचा वापर बदलतो.

एका नागरिकाचा रोजचा पाणी वापर १३५ ते १५० लिटर इतका असतो. मात्र, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका पाहुण्यामागे दररोज ५०० ते १ हजार लिटर पाण्याचे नियोजन करावे लागते.

कुठे खर्च होते सर्वाधिक पाणी?

  • फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये

  • पाहुण्यांची अंघोळ व बाथरूम वापर

  • बेडशीट, टॉवेल, लॉन्ड्री

  • स्विमिंग पूल देखभाल

  • वातानुकूलन यंत्रणांतील कूलिंग टॉवर्स

  • उद्याने व लँडस्केपिंग

  • बहुमजली रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉल

आकडे काय सांगतात?

  • एका २५० खोल्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलचा पाणी वापर हा एका लहान सोसायटीच्या दैनंदिन वापराइतका असू शकतो.

  • १ लाख लिटर पाण्यात सुमारे ६५० ते ७५० नागरिकांची दिवसाची गरज भागू शकते.

  • मोठ्या हॉटेलमधील एकूण पाणीवापरापैकी ३० ते ४० टक्के वापर लॉन्ड्री, नगृहांमध्ये होतो.

  • पाणी पुनर्वापर प्रकल्पांमुळे ५० टक्के पाण्याची बचत होऊ शकते.

हॉटेलमधील वापर

  • स्वयंपाकघर

  • भांडी धुणे

  • ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी

  • स्वच्छतागृहे

  • दैनंदिन साफसफाई

एका पाहुण्यामागे पाण्याचा वापर

  • फाईव्ह स्टार हॉटेल : ५०० ते १,००० लिटर

  • फोर स्टार : ३५० ते ७५० लिटर

  • थ्री स्टार : २५० ते ५०० लिटर

  • बजेट हॉटेल :१५० ते ३०० लिटर

  • सामान्य नागरिक : १३५ ते १५० लिटर

पाणीटंचाईवर उपाय काय ?

शहरातील अनेक मोठ्या हॉटेलांनी आता सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. या पाण्याचा वापर बागा, फ्लशिंग आणि स्वच्छतेसाठी केला जातो. काही हॉटेलांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असून, कमी प्रवाहाचे नळ, सेन्सरयुक्त टॅप आणि पाणी बचतीची उपकरणे बसवली आहेत. नागरिकांप्रमाणेच व्यावसायिक क्षेत्रानेही पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे मत हॉटेल व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT