पुणे

जलसंकट : जुन्नर तालुक्यात नदी-नाले कोरडेठाक

Sanket Limkar

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : रोहिणी संपून मृग नक्षत्र सुरू झाले, तरी जुन्नर परिसरातील अनेक गावांमध्ये अद्याप पाऊस झालेला नाही. नांगरट केलेल्या शेतातील ढेकळं देखील अद्याप फुटलेली नाहीत. रोहिणी नक्षत्र तर पूर्णपणे कोरडे गेले. मृग नक्षत्र संपण्यास आता चार दिवस शिल्लक आहेत. पावसाअभावी शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. काही भागांत वळवाचा पाऊस झाला. परंतु ब-याच ठिकाणी अद्याप पाऊस पडलेला नाही. शेतकर्‍यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. जुन्नर तालुक्याच्या कुमशेत, कालदरे, गोळेगाव, लेण्याद्री, जुन्नर, कुसूर, वडज, पारुंडे, काले, तांबे, बुचकेवाडी, दातखळवाडी, बोतार्डे शिंदे, राळेगण या भागात अद्याप पाऊस झालेला नाही.

आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला तर खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. पावसाने गुंगारा दिला तर शेतकर्‍यांच्या अडचणी वाढणार आहेत. कडक उन्हामुळे या भागातील विहिरी तसेच कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.

पिके वाचवण्यासाठी धडपड

काही शेतकर्‍यांकडे थोडेफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, ते चारा पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात काही ठिकाणी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी, 14 नंबर, भोरवाडी, कांदळी, वडगाव, येळगाव, आळेफाटा, पिंपरी पेंढार, काळवाडी, उंब्रज या भागामध्ये वळवाचा पाऊस झाला. परंतु, तो पेरणीसाठी पुरेसा नाही. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नदी, नाले पडले कोरडे

जुन्नर तालुक्यात अद्याप जोरदार पाऊस न पडल्याने ओढे, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. निरगुडे येथील बंधारा कोरडाठाक पडला आहे. मीना नदीवरील बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तालुक्यातील नद्यांचे पात्र देखील अद्याप कोरडेच आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT