Warje Water Wastage Pudhari
पुणे

Warje Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात वारजेत पाण्याचा अपव्यय; नादुरुस्त स्प्रिंकलरमधून वाहतेय पाणी

तत्‍काळ दुरुस्ती करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वारजे: सध्या पाणीटंचाईमुळे दुष्काळ जाहीर झाला असून, प्रशासनाकडून पुणे शहरात पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असताना वारजे परिसरात महामार्गालगत असलेल्या लॉनवरील नादुरुस्त स्प्रिंकलरमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रशासनाकडून महामार्गलगत वारजेतील स्व. रमेश वांजळे हायवे चौक ते डुक्कर खिंडपर्यंत दोनही बाजूला लॉनवर स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत, यातील अनेक ठिकाणच्या स्प्रिंकलरची यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसल्याने पाणी नियोजित पद्धतीने झाडांना देण्याऐवजी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे चित्र दररोज सायंकाळी दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या लॉनला पाणी देताना पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.

एकीकडे शहरात पाणीबचतीसाठी नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन करीत दर गुरुवारी पाणीकपात होत आहे. तसेच, महापालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईच्या उपाययोजनाही जाहीर केल्या असताना अशा पद्धतीने होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेच्या उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे असताना, अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी नादुरुस्त सिंचन यंत्रणेमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होणे ही बाब गंभीर असून, संबंधित प्रशासनाने या नादुरुस्त स्प्रिंकलरची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा आणि पाणीबचतीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पाणीटंचाई असल्याने पाणीबचत करणे गरजेचे आहे. हिवाळा सुरू असून, या लॉनवर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, लॉनवरील सर्व पाणी लॉनवर न पडता रोज रात्री मुख्य रस्त्यावर वाहत आहे. पाणी सोडल्यानंतर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच, येथील पाण्याचा अपव्यय टाळावा.
- अभ्युदय बराटे, सामाजिक कार्यकर्ते
वारजे महामार्गालगत लॉनवर हिरवीगार झाडेदेखील आहेत. ही झाडे सुकू नयेत यासाठी आवश्यकतेनुसार रात्री एकवेळ फक्त पाणी सोडण्यात येत आहे. काही स्प्रिंकलर खराब असतील तर ते पाहणी करून दुरुस्त करण्यात येतील.
- संदीप कापरे, उद्यान विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT