Sand Mining Pudhari
पुणे

Pune Illegal Sand Mining: वारजे मुठा नदीत बेकायदा वाळूउपसा; कारवाईची नागरिकांची मागणी

दांगट इंडस्ट्रीअल परिसरातील मुठा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा; पर्यावरणाला धोका

पुढारी वृत्तसेवा

वारजे: वारजे येथील दांगट इंडस्ट्रीअल इस्टेट परिसरातील मुठा नदीपात्रामध्ये रात्रीच्या वेळी बेकायदा उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत आहे. यामुळे परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या वाळूउपशाचा तातडीने पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दांगट इस्टेट येथे गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी नदीपात्र पोखरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. नदीपात्रामध्ये चोरवाटा तयार करून हा वाळूउपसा सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. नदीमध्ये ठिकठिकाणी उत्खनन करून वाळूचा उपसा केला जात असल्याने अनेक ठिकाणी खडी आणि मातीचे ढीग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नदीपात्राचा आकार बदलत असून, पर्यावरणाची हानी होत आहे.

नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे, झुडुपे वाढली असल्याने वाळूमाफियांचा हा प्रताप कोणालाही दिसून येत नाही. नदीपात्रामध्ये बेट तयार ते वाळूउपसा करीत आहेत. काही अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी जेसीबी आणि पोकलँडच्या साहाय्याने नदीपात्रात खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून ती ट्रॅक्टरमध्ये भरली जात आहे.

मात्र, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही, असा सवाल परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बेसुमार वाळूउपसा होत आहे. मात्र, महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दांगट इंडस्ट्रीअल इस्टेट परिसरातील मुठा नदीपात्राची महसूल विभागाचे पथक लवकरच पाहणी करणार आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या वाळूउपशाचा पंचनामा करून तातडीने संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
डॉ. अर्चना निकम, तहसीलदार, हवेली तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT