"तुला रिंगण मेंढ्याचे, अंथराया धोतराची जोडी
तुझ्या नामात भिजून, चिंब झाली काटेवाडी
काटेवाडी : ज्ञानोबा - माउली तुकाराम चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजरात काटेवाडीकर भक्तीरसात न्हाउन निघाले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथाभोवती मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण काटेवाडी (ता. बारामती) येथे शुक्रवारी (दि. २७) पार पडले. या वेळी पारंपरिक पद्धतीने पालखीच्या स्वागतासाठी धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी पहाटे बारामती शहरातुन प्रस्थान ठेवले. मार्गावरील स्वागत स्वीकारत काटेवाडी येथे दुपारी १२ वाजता पालखी सोहळ्याचे आगमन झाले. मुख्य मागार्पासून गावातील दर्शन मंडपात पालखी नेण्यात आली. पालखी रथातून दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परिट समाज बांधवांच्यावतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. बँडपथक, छत्रपती हायस्कूलचे मुलीचे लेझीमपथक यांनी पालखीचे स्वागत केले. हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी दर्शन मंडपात नेली.
पालखी सोहळ्याचे शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, सरपंच मंदाकिनी भिसे, उपसंरपच मिलिद काटे, छत्रपतीचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल काटे, पणन विभागाचे विभागीय उपसरव्यवस्थ्थापक सुभाष घुले, दूध संघाचे संचालक संजय शेळके, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडूरग कचरे, अजित रमेश काटे, उद्योजक वैभव काटे, श्रीधर घुले, सोसायटीचे अध्यक्ष विजयसिंह काटे आदींनी स्वागत केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काटेवाडी गावात दाखल झाल्यावर परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची परंपरा आहे. १४० वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरु झाल्याचे सांगितले जाते. काटेवाडी गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर ग्रामस्थ पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात.
काटेवाडी येथे पालखीच्या स्वागतासाठी पताका, स्वागत कमानी, लावून परिसराची सजावट केली होती. दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते. पालखी सोहळ्या दुपारी विसावल्यानंतर वारकरी भाविकांनी गावात व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खासदार सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या.
भोजन व विश्रांतीनंतर दुपारी ३ वाजता पालखी पुन्हा काटेवाडी येथील विसावा दर्शन मंडपातून रथामध्ये आणण्यात आली. तात्यासो मासाळ, महादेव काळे, सुभाष मासाळ, जालिंदर महारनवर, उत्तम हाके, विकास केसकर, गुलाब महारनवर, पाटोळे आदींच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. या पेळी उपस्थित भाविकांनी "बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... हरिनामाचा गजर केला. या वैशिष्टपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
बारामती तालुक्याच्या वतीने, प्रांतधिकारी वैभव नावडकर, गटविकास अधिकारी अनिल बागल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे, पोलिस पाटील सचिन मोरे य पालखी सोहळ्याला निरोप दिला.