Ward 39 Politics PMC Elections Pudhari
पुणे

Ward 39 Politics PMC Elections: प्रभाग 39 मध्ये चुरस शिगेला; भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे आव्हान

नवीन भागांच्या समावेशामुळे राजकीय समीकरणे बदलली; अप्पर-सुपर-इंदिरानगरमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 39 अप्पर-सुपर-इंदिरानगर

अप्पर- सुपर-इंदिरानगर या प्रभागात कमळ फुलण्यासाठी भाजपला अनुकूल अशी प्रभागरचना केली गेल्याची चर्चा राजकीय वर्तळात सुरू आहे, परंतु प्रभागरचनेत बदल झाल्यामुळे जुन्या प्रभागामधील भाजपची हक्काची मते प्रभाग क्रमांक 20 मध्ये गेली आहेत. तसेच जुन्या प्रभाग क्रमांक 38 मधून 35 हजार मतदारांचा प्रभाग क्रमांक 39 मध्ये समावेश करण्यात आला आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) ताकद आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

या प्रभागाची लोकसंख्या 78 हजार 826 इतकी आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गाची संख्या जवळपास 15 हजार 599 इतकी आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांचे मत निर्णायक ठरणार आहे. या प्रभागात ‌‘अ‌’ गट अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग, ‌‘ब‌’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‌‘क‌’ गट सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि ‌‘ड‌’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे.

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तीन सदस्यीय एकमेव प्रभगातून भाजपचे रूपाली धाडवे, वर्षा साठे यांनी विजय मिळला होता, तर शिवसेनेचे उमेदवार बाळा ओसवाल हे निवडून आले होते.

भाजपची हक्काची व्होट बँक असलेल्या या प्रभागातील अप्पर ओटा, महेश सोसायटी, चिंतामणीनगर भाग एक व दोन, दामोदर सोसायटी इत्यादी भागाचा प्रभाग क्रमांक 20 मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे भाजपची हक्काची मते प्रभाग क्रमांक 20 मध्ये गेली आहेत. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाचे प्राबल्य आणखी वाढले आहे. मात्र, या प्रभागाला सुखसागरनगर, राजस सोसायटी आणि बालाजीनगरचा काही भाग नव्याने जोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मतदार वाढले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश कदम यांचे चिरंजीव प्रतीक कदम यांनी या प्रभागातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले गणेश मोहिते यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, ते शिवसेनेकडून (शिंदे गट) लढणार आहेत. यामुळे प्रभागातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

भाजपचे या प्रभागात प्राबल्य चांगले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेनेची (ठाकरे गट) या प्रभागात ताकद आहे. यामुळे आगामी निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजप पक्षाकडील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट वाटपानंतर नाराजी नाट्य उद्भवण्याची चर्चा आहे. भाजपने तिकीट नाकारलेले इच्छुक इतर पक्षांमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांची संख्याही मोठी आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून अनेक उमेदवार उभे राहिल्याने मतांचे विभाजन झाले होते. त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला होता. भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) तिकीट न मिळाल्यास काही इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाऊन निवडणूक लढविण्याच्या तयारी असल्याचेही बोलले जात आहे. तसेच काही अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारी आहेत.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील माजी नगरसेवकांनी विविध विकासकामे केली असली, तरी अद्यापही काही कामे रखडली आहेत. यामुळे उमेदवारी मिळणाऱ्या माजी नगरसेवकांना याचा फटका बसू शकतो. तसेच प्रभागात अद्यापही विविध प्रश्न, समस्या कायम असल्यानेही माजी नगरसेवकांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

प्रभागातील विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार

भाजपकडून बाळा ओसवाल, रूपाली धाडवे, दिनेश धाडवे, भीमराव साठे, वर्षा साठे, राहुल पाखरे, दिगंबर डवरी, शारदा भोकरे, अजय भोकरे, विकास लवटे, अजित शेळके, विद्या शेळके, आनंद साळुंके, स्वपनील माकुडे, आश्विनी माकुडे हे इच्छुक आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून सचिन जोगदंड, महेश कदम, श्वेता कदम हे इच्छुक आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून गणेश मोहिते, मनीषा मोहिते, अविनाश खेडेकर, शैलेंद्र चव्हाण यांची नार्वे चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून प्रतीक कदम, सतीश वाघमारे हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अमोल परदेशी, स्नेहा परदेशी, प्राजक्ता जाधव यांची नार्वे चर्चेत आहे. काँग्रेसपक्षाकडून जयकुमार ठोंबरे, अश्विनी ठोंबरे, रमेश सोनकांबळे, सचिन कदम, राजू जगताप हे इच्छुक आहेत. मनसेकडून राहुल गवळी, महेश भोईबार, सागर खोमणे यांची नार्वे चर्चेत आहे. रिपाई पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)पक्षाकडून बाबुराव घाडगे हे इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. रवींद्र गायकवाड यांची नार्वे चर्चेत आहे. अपक्षकडून संजय वाघमारे, सचिन साठे, निरंजन घाटे हे इच्छुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT