वानवडीकरांना नवीन प्रकल्पांची वानवा Pudhari
पुणे

Wanwadi Issues PMC Election: वानवडीकरांना नवीन प्रकल्पांची वानवा

जलतरण तलाव, सांस्कृतिक भवनासह पायाभूत सुविधा रखडल्या; नवीन प्रकल्पांना जागा नाही तर जुन्यांना न्याय का नाही, नागरिकांचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 18 वानवडी-साळुंखे विहार

सुरेश मोरे

प्रभाग क्रमांक 18 मध्ये वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, रस्त्यांची दुरवस्था यांसह विविध समस्यांमुळे वानवडीकर त्रस्त झाले आहेत. माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या प्रभागात नवीन प्रकल्पांना जागा उपलब्ध नसल्याचे सांगत आहे; मग जुन्या प्रकल्पांना न्याय का दिला जात नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जलतरण तलाव आणि सांस्कृतिक सभागृहाची दुरवस्था झाली आहे.

तिमानगर येथे सोलापूर रस्त्यामध्ये दुभाजक टाकल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. प्रभागातील जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासह सुशोभीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवनाची देखील दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. फातिमानगर चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वानवडी परिसरात पूर्वी झालेली कामे वगळता नवीन कोणतेही प्रकल्प झालेले दिसत नाही.(Latest Pune News)

प्रभागातील रस्त्यांवर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे या समस्येत आणखी भर पडत आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगही साचल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काळात लोकप्रतिनिधी प्रभागाच्या विकासात कमी पडल्याची भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रभागातील प्रमुख समस्या

परिसरातील रस्त्यांवर होणाऱ्या

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

साळुंखे विहार, शिवरकर रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा

अनधिकृत भाजी मंडई, पथारी व्यावसायिकांचे ठिकठिकाणी अतिक्रमण

क्रीडागंण, पदपथांची दुरवस्था झाल्याने मुलांसह नागरिकांची गैरसोय

मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

रस्त्यांच्या कडेला ठिकठिकणी कचरा साचत असल्याने दुर्गंधी

नाला गार्डनमधील भाजी मंडईची समस्या

सोसायट्या व व्यावसायिकांचे रस्त्यावर होणारे अनधिकृत पार्किंग

माननीयांना या प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

नाला गार्डन येथे भाजी मंडईचे उद्घाटन झाले, तरी अनधिकृत विक्रेते साळुंखे विहार रस्त्यावर का?

शिवरकर रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न कधी सुटणार?

कत्तलखान्यातून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यापासून नागरिकांची सुटका कधी होणार?

क्रीडांगणे उपलब्ध नाहीत, तर मुलांनी खेळायचे कुठे?

नवीन प्रकल्प प्रभागात का होत नाहीत?

महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रभागाच्या विकासासाठी मिळालेल्या निधीतून वानवडी गावालगतच्या नाल्याची सीमाभिंत बांधली. अत्याधुनिक डायलिसिस सेंटर सुरू केले. शिवलकर रुग्णालयाचे सुशोभीकरण, शिवलकर गार्डन येथे महिला आणि पुरुषांसाठी जीम व्यवस्था, ससाणे उद्यान सुशोभीकरण, योगासाठी पॅगोडा निर्मिती, स्मशानभूमी सुशोभीकरण आदींसह विविध कामांवर निधी खर्च केला.
कालिंदा पुंडे, माजी नगरसेविका
महापालिकेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून रिलायन्स मार्टलगतच्या भैरोबानाला येथे मोठ्या व्यासाची पाइप लाइन टाकून दुर्गंधीयुक्त पाणी बंदिस्त केले. महा-पालिकेच्या महादजी शिंदे शाळेच्या परिसरात आंतरराष्ट्रीय पध्दतीचे बास्केटबॉल स्टेडियम उभारले. तसेच प्रभागातील रस्ते, वीज, ड्रेनेज, पावसाळी लाइनसह विविध विकासकामे मार्गी लावली.
धनराज घोगरे, माजी नगरसेवक
वानवडीतील विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिकांची गैरसोय होत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या काळात प्रभागाच्या माजी नगरसेवकांचे वानवडीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे.
दिनेश सामल, मनसे
महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रभागाच्या विकासासाठी तुटपुंजा निधी मिळाला. यातून जेवढी कामे करता आली तेवढी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपच्या नगरसेवकांना जास्त निधी मिळाला, तरीही त्यांना प्रभागात एकही नवीन प्रकल्प आणता आला नाही. तसेच खासदार, आमदार भाजपचे असूनही त्यांचेही वानवडीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रशांत जगताप, माजी नगरसेवक
महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकमध्ये तुटपुंजा निधी मिळाला. तरीही प्रभागातील विविध विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावली.
रत्नप्रभा जगताप, माजी नगरसेविका
वानवडी परिसरात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, कचरा, शांतीनगर, आझादनगर येथील विजेची समस्या आणि महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक सभाग्ृाहाची दुरवस्था झाली आहे. जलतरण तलावाचे सुशोभीकरण झाले नाही. यासह विविध समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
साहिल केदारी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग््रेास ओबीसी विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT