पुणे: वानवडी-साळुंखे विहार प्रभागातील मतदान केंद्रांवर दुपारनंतर झालेली गर्दी, कोंढवा-खुर्द-कौसरबागच्या केंद्रांवर दिसलेला मतदानासाठीचा उत्साह अन् महमंदवाडी-उंड्रीमध्ये झालेले उत्साही प्रतिसादात मतदान... असे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले ते वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये. प्रभाग क्र. 18, 19 आणि 41 येथे सकाळच्या सत्रात मतदानासाठी मतदारांचा ओघ कमी राहिला. पण, दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी झाली आणि मतदारांनी उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांची आणि विशेषत: नवमतदारांची संख्या मोठी होती. काही प्रकार वगळता तिन्ही प्रभागांमध्ये मतदानाला प्रतिसाद मिळाला.
वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 18 वानवडी-साळुंखे विहार, प्रभाग क्र. 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग आणि प्रभाग क्र. 41 महमंदवाडी-उंड्री येथे सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. तिन्ही प्रभागांतील बहुतांश मतदान केंद्राच्या शंभर मीटर बाहेर सर्वच पक्षांनी स्लिप देण्यासाठी बूथ उभारले होते. येथे मतदारांनी आपल्या मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी गर्दी केली. वानवडी-साळुंखे विहार या प्रभागातील प्रत्येक केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी कमी होती. एसआरपीएफ येथील मतदान केंद्र, परमार सोसायटी, सनग््रेास स्कूल, साळुंखे विहार सोसायटी, अशा विविध केंद्रांवर दुपारी 3 नंतर मतदारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली.
प्रभागात कुठे दोन गटांमध्ये वादावादी, कुठे एका उमेदवाराने दुसऱ्या मतदारावर बोगस मतदार आणल्याचा केलेला आरोप, कुठे ईव्हीएम बंद पडणे, कुठे वादावादीमुळे वाढलेला पोलिस बंदोबस्त... असे प्रकार घडले. महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केलेच. त्याशिवाय पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदार तरुणांसह अनुभवी ज्येष्ठ मतदारांचीही संख्या मोठी होती. दुपारी 4 नंतर तर काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या आणि सायंकाळी 6 म्हणजेच मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोंढवा खुर्द-कौसरबाग या प्रभाग क्र. 19 मध्ये तर सकाळपासूनच केंद्रांवर मतदानासाठीचा उत्साह पाहायला मिळाला. या प्रभागात शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. येथे वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मतदान केले, तर प्रभाग क्र. 41 महमंदवाडी-उंड्री येथेही सकाळी असेच चित्र दिसून आले. येथील बहुतांश केंद्रांवर दुपारनंतर गर्दी झाली. काही केंद्रांवर मतदानाची वेळ संपली तरी मतदार मतदानासाठी येत होते. तिन्ही प्रभागात ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था होती.
पण, काही ठिकाणी त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, तर केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मतदारांना सहकार्य करण्यात येत होते. तिन्ही प्रभागांमध्ये मतदार यादीत नाव शोधण्यासाठी अनेकांना अडचणी आल्या. आधारकार्ड, मतदान ओळखपत्र नसल्याने अनेकांना मतदान न करताच माघारी फिरावे लागल्याचे दिसून आले. काहींनी मतदान केंद्रातून बाहेर आल्याक्षणीच सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर शेअर केला. सकाळी बहुतांश मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. दुपारनंतर गर्दी वाढली. सायंकाळनंतर केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली.