Election Nomination Pudhari
पुणे

PMC Election Nomination: अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांची धावपळ; वानवडी–कोंढवा कार्यालयात गर्दी

प्रभाग १८, १९ व ४१ मधून शेवटच्या दिवशी तब्बल ८० उमेदवारी अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

वानवडी : अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची सुरु असलेली धावपळ...उमेदवारांचा उत्साह वाढविण्यासाठी पक्षाचे नाव आणि चिन्ह, टोपी घालून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते अन्‌ अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांसह छायाचित्रे टिपणारे उमेदवार...असे चित्र मंगळवारी (दि. 30) पाहायला मिळाले ते वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात.

शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची क्षेत्रीय कार्यालयात मोठी गर्दी झाली. दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपत आल्याने काही उमेदवार धावपळ करत कार्यालयात पोहोचले अन्‌ शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.

वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 18 वानवडी-साळुंखेविहार, प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग आणि प्रभाग क्रमांक 41 महंमदवाडी- उंड्री या प्रभागांतील इच्छुक उमेदवार अर्ज भरण्याच्या गडबडीत दिसून आले. त्यामुळेच क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सकाळी अकरा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी तिन्ही प्रभाग मिळून सुमारे 80 उमेदवारांनी अर्ज भरले. पक्षाचे चिन्ह, नाव असलेले उपरणे आणि टोपी घातलेले कार्यकर्ते उमेदवारांसह कार्यालयात अर्ज भरण्यासाठी येत होते आणि सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर एक-एक करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सुपूर्द करण्यात आले.

दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले, पण दुपारी तीन वाजल्‍यानंतर अर्ज स्वीकारण्याची वेळ संपली आणि त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयात उशिरा आलेल्या उमेदवार, कार्यकर्त्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. पण क्षेत्रीय कार्यालयाच्या आत काही उमेदवार उपस्थित होते. दुपारी तीननंतर याच उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. पण या उमेदवारांची संख्याही मोठी होती. त्यामुळे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार असल्याने पाेलिसांचा चोख बंदोबस्त कार्यालयाच्या ठिकाणी होता.

प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द-कौसरबागमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साईनाथ बाबर, प्रभाग क्रमांक 18 वानवडी-साळुखेविहारमधून भारतीय जनता पक्षाकडून कालिंदा पुंडे, भारतीय जनता पक्षाकडून अभिजित शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) निकिता जगताप, दिलीप जांभुळकर, योजना चौघुले, रोहन गायकवाड, शिवसेना शिंदे गटाकडून पल्लवी केदारी, प्रेम दरेकर आदी उमेदवारांनी मंगळवारी अर्ज भरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT