पुणे

सारसबागेजवळील चौपाटीला वॉकिंग प्लाझा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सारसबाग चौपाटी येथे महापालिकेच्या वतीने वॉकिंग प्लाझा विकसित करण्यात येणार आहे. तसेच येथील खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांनी अटी व शर्तींचे हमीपत्र दिल्यानंतर स्टॉल सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम राबविली जात आहे. तसेच पथारी, स्टॉलधारकांकडून थकबाकीही वसूल केली जात आहे. कारवाई अंतर्गत सारसबाग चौपाटीवरील खाद्य पदार्थांचे सर्व स्टॉल सील करून शेड, टेबल, खुर्च्या व इतर साहित्य जप्त केले आहे. याठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने मागील दोन आठवड्यांपासून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही. याशिवाय तुळशीबागेतील परवानाशुल्काची थकबाकी असलेल्या दोनशेहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे व्यवसाय बंद केले आहेत, तर नुकतेच तीन दिवसांपूर्वी बिबवेवाडी येथील रस्त्यावरील 51 गाळे सील केले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर पथारी व्यावसायिक संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढण्याची व व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. यात सारसबाग चौपाटी येथे वॉकिंग प्लाझा करण्याचा तसेच येथील स्टॉलधारकांनी हमीपत्र दिल्यानंतर स्टॉल सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बिबवेवाडी येथील गाळे नियमित करण्यासंदर्भात आणि बेकायदा गाळ्यांवर कारवाई करण्याचे व तुळशी बागेतील थकबाकीदारांना पैसे भरण्यासाठी हप्ते बांधून देण्यावरही चर्चा झाल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

सारसबाग चौपाटीवरील स्टॉलधारकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे स्टॉलच्या समोर टेबल किंवा खुर्च्या मांडणार नाही, स्टॉल परस्पर भाड्याने जेणार नाही, स्टॉलच्या वर दुसरा मजलाकरणार नाही, रात्री स्टालमध्ये कामगार राहणार नाहीत, नियमांचे व अटींचे उल्लंघन करणार नाही, असे प्रतिद्न्या पत्र लिहून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना स्टॉल सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. स्टॉलधारकांना या माध्यमातून एक संधी दिली जाणार आहे. त्यांनी पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

                        – माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख, महापालिका

SCROLL FOR NEXT