राजगड तालुका नामकरणाचे जल्लोषात स्वागत Pudhari
पुणे

Rajgad Taluka: वेल्हे तालुक्याचे नामकरण ’राजगड तालुका’

ढोल-ताशांचा गजर हलगी-तुतारीचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या वेल्हे तालुक्याचे नामकरण ’राजगड तालुका’ करण्यात आल्याची केंद्र सरकारने घोषणा केली. या ऐतिहासिक निर्णयाचे गुरुवारी (दि. 21) वेल्हे बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात, हलगी-तुतारीच्या निनादात आणि ’जय शिवराय, हर हर महादेव’च्या घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शेकडो मावळ्यांसह विविध पक्षांचे नेते, संघटनांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latest Pune News)

याआधी राज्य मंत्रिमंडळाने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा होती. अखेर केंद्राच्या मान्यतेनंतर राजगड तालुका अधिकृतपणे देशाच्या नकाशावर झळकणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 वर्षे वास्तव्य केलेला व हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला हेच नाव तालुक्यास मिळावे, यासाठी मावळा जवान संघटना गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील होती.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे, भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनीदेखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. अखेर या ऐतिहासिक मागणीला यश मिळाले. वेल्हे-तोरणा, पानशेत, सिंहगड परिसरात फटाक्यांची आतषबाजी, पेढे-साखरेचे वाटप, पारंपरिक उत्सव व स्वागत सोहळ्यांतून निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. पंचायत समिती आवारातील शिवस्मारकास पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

या वेळी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, सहायक गटविकास अधिकारी एस. टी. तेलंग, वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील, भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य बाळासाहेब गरूड, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जीवन कोंडे, तालुकाध्यक्ष राजू रेणुसे, आनंद देशमाने, सुनील जागडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, बाळासाहेब सणस, इंद्रजित जेधे, लक्ष्मण भोसले, खंडू गायकवाड, रामभाऊ राजीवडे आदी उपस्थित होते. ’तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे.

यातून राजगड तालुका हा जगाच्या नकाशावर येणार आहे. या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे योगदान मोलाचे आहे,’ असे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.

भगवान पासलकर म्हणाले, ’जगातील पहिल्या स्वतंत्र लोकशाही राष्ट्राची राजधानी असलेल्या राजगडाच्या नावाने तालुका ओळखला जाणार ही शिवकाळातील अभिमानास्पद परंपरेला दिलेली खरी मानवंदना आहे. दत्ताजी नलावडे म्हणाले, ’राजगड तालुका नामकरणाने शिवकाळातील स्मृतींना उजाळा मिळाला असून प्रखर राष्ट्रीय भावनेचा जागर होईल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT