वालचंदनगर: अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील राजेश ऊर्फ तात्या सायबू पवार (वय 21) याला आकाश चौगुले (वय 22) याने माझ्या घरातील मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर का टाकला, याचा जाब विचारला.
त्यामुळे चिडून जाऊन राजेशने आकाश याचा गळा घट्ट आवळून त्याला दगडावर ढकलून दिल्याने आकाश याचा मृत्यू झाला. याबाबत वालचंदनगर पोलिस ठाण्यात आरोपी राजेश ऊर्फ तात्या सायबू पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. (latest pune news)
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी (दि. 3) अंथुर्णे येथील आकाश मुसा चौगुले व त्याची आई शांताबाई चौगुले आपल्या घरी असताना गावातीलच नातेवाईक असलेला आरोपी राजेश सायबू पवार याने आकाश याच्या कुटुंबातील मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवरून आकाशला पाठवला.
या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आकाश व त्याची आई राजेश पवार याच्या घरी गेले. त्यांनी राजेश याला याबाबत विचारणा केली असता राजेश याने आपल्या घरासमोरील अंगणात आकाश याला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारत त्याचा गळा हाताने घट्ट दाबून ढकलत नेले आणि त्याने आकाश यास दगडाच्या ढिगार्यावर जोरात आपटले.
यामध्ये आकाश याच्या डोक्याला जबर मार लागल्याने आकाश जागेवरच निपचित पडला. आकाश निपचित पडल्याचे पाहून आरोपी राजेश याने दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. तद्नंतर आकाश याच्या आईने आरडाओरड करून इतराना मदतीसाठी बोलावून आकाश यास लासुर्णे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच आकाशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तत्काळ आरोपीला पकडण्यासाठी तीन पोलिस रवाना केले. कडबनवाडी गावच्या हद्दीमधील वन विभागाच्या क्षेत्रामध्ये लपून बसलेल्या पवार याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार डुणगे घटनेचा तपास करत आहेत. आरोपीला शोधण्यात सहायक पोलिस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलिस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रेय चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी कामगिरी केली.