दीपक नायक
वाघोली: वाघोली परिसरात शुक्रवारी (दि. 22) झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परिसरातील अनेक भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबल्याचे चित्र या वेळी दिसून आले. विशेषतः फुलमळा-भावडी रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर पाणी साचल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याचे चित्र दिसून आले. गेली अनेक वर्षांपासून हा प्रश्न अद्यापही सुटला नाही. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. मात्र, संबंधित विभागाकडून अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात परिसरातील जलनिस्सारणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन उमेदवारांनी होते. मात्र, मान्सूनपूर्व पावसातच अशी स्थिती निर्माण झाल्याने पावसाळ्यात काय होणार? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
केसनंद रस्त्यालाही पुराचे स्वरूप
मान्सूनपूर्व पावसामळे वाघोली-केसनंद रस्त्यांलाही पुराचे स्वरूप आले होते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहत असलेल्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. काही दिवसांपूर्वी केसनंद रस्त्याच्या साईडपट्टीचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या पावसामुळे साईपट्टीची पुन्हा दुरवस्था झाली आहे.
ड्रेनेज विभागाच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित भागांची पाहणी केली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात उपायुक्त आणि सहायक आयुक्त वाघोली परिसराचा पाहणी दौरा करणार आहेत.रत्नमाला सातव, नगरसेविका
पावसाळी वाहिन्याच्या साफसफाईचे काम सुमारे ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित वीस टक्के कामही पावसाळापूर्वी पूर्ण करण्यात येईल.अनिल सातव-पाटील, नगरसेवक
फुलमळा-भावडी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी विद्युत पंप सुरू केले आहेत. लवकरच पाण्याचा निचरा होईल.प्रतीक थोरात, कनिष्ठ अभियंता, महापालिका