राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा
वाफगाव–रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अश्विनीताई राजुशेठ पाचारणे या सध्या मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक गावांमध्ये उपस्थित राहण्याचा आग्रह मतदारांनी धरला होता. मतदारांनी दाखवलेल्या या आपुलकीचा मान ठेवत अश्विनीताई पाचारणे आणि राजुशेठ पाचारणे यांनी विविध गावांमध्ये ध्वजारोहण तसेच संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या दरम्यान गावोगावी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मतदारांचा वाढता प्रतिसाद आणि मिळणारी आपुलकी यामुळे वाफगाव–रेटवडी गटात अश्विनीताई पाचारणे लोकप्रिय उमेदवार ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिन गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळांमधून प्रभात फेऱ्या, ध्वजारोहण समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाफगाव–रेटवडी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या दमदार उमेदवार आणि राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांना अनेक गावांमध्ये या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. समर्थक कार्यकर्त्यांसह त्यांनी अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांना भेटी देत कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
मार्गावर, घरी किंवा कार्यक्रमस्थळी भेटणाऱ्या प्रत्येक मतदाराशी संवाद साधत त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आगमनाची चाहूल लागताच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक मतदारांनी त्यांच्याशी हितगुज साधून आपुलकी व्यक्त केली.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून अश्विनीताई पाचारणे यांचा मतदारसंघातील आबालवृद्धांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. स्वतःचा बैलगाडा असल्यामुळे गावोगावी होणाऱ्या बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातूनही त्या मतदारांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून अश्विनीताई पाचारणे, राजुशेठ पाचारणे आणि त्यांच्या समर्थकांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधला आहे.
रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि शेतीविषयक प्रश्न सोडवण्याचा विकासाचा संकल्प तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मदत व सहकार्याची भावना यामुळे त्या एक सक्षम उमेदवार म्हणून मतदारांच्या पसंतीस उतरल्या आहेत. महिला असूनही कारखानदारीत यशस्वी ठरलेल्या अश्विनीताई पाचारणे महिलांसाठी उद्योग आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करतील, असा विश्वास मतदारसंघात व्यक्त केला जात आहे.
निवडणूक प्रक्रियेपूर्वी महिलांसाठी आयोजित केलेल्या देवदर्शन यात्रेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे त्यांची विजयाची शक्यता वाढल्याचे भांबुरवाडीचे सरपंच संतोष ढोरे, वाफगावचे माजी सरपंच राजेंद्र टाकळकर, धनंजय भागवत, गुळाणीच्या माजी सरपंच कुंदाताई ढेरंगे आणि निमगावचे महेंद्र काळे यांनी सांगितले.