Wadgaon Sheri Waterlogging Pudhari
पुणे

Wadgaon Sheri Waterlogging: कोट्यवधी खर्चूनही वडगाव शेरीत पूरस्थिती कायम! मुसळधार पावसानंतर घरांमध्ये शिरते पाणी

पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज लाईन असूनही समस्या सुटली नाही; अतिक्रमणे आणि तांत्रिक त्रुटींवर नागरिकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

वडगाव शेरी: महापालिकेने वडगाव शेरी, चंदननगर, विमाननगर, खराडी आणि कल्याणीनगर परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज लाइन टाकल्या आहेत. मात्र, मुसळधार पावसानंतर या भागात अजूनही पूरस्थिती निर्माण होत असून, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे. ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणे, तसेच पावसाळी वाहिन्यांच्या कामांतील त्रुटींमुळे दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोहगाव परिसरातून येणाऱ्या ओढ्याचे पाणी विमाननगर, शास्त्रीनगर, पाचवा मैल, दर्गा मार्ग, वडगाव शेरी आणि खराडीमार्गे मुळा-मुठा नदीत जाते. गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. त्यासाठी अनेक ठिकाणी ओढ्याची रुंदी कमी करण्यात आली, तर काही ठिकाणी त्याचा नैसर्गिक प्रवाहही बदलण्यात आला.

तसेच, अनेक ठिकाणी पावसाळी जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी वाहिन्या जोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मुसळधार पावसानंतर ड्रेनेजमधून पाणी उलट बाहेर येऊन रस्ते व घरांमध्ये शिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने वडगाव शेरी परिसरात कोट्यवधी रुपये खर्च केले असले, तरी तांत्रिक अडचणी अद्याप दूर झालेल्या नाहीत. परिणामी, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते करिम शेख म्हणाले की, महापालिकेने दरवर्षी प्रामाणिकपणे नाल्यांची सफाई केली, नाल्यांचे योग्य प्रकारे चॅनेलायझेशन केले आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून त्यांचे रुंदीकरण केले, तर पूरस्थिती मोठ्या प्रमाणात टाळता येईल.

कोट्यवधी खर्चूनही साचते पाणी

सेंट अर्नोल्ड शाळेजवळ महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून नाला कल्व्हर्टचे काम सुरू आहे. मात्र, पावसात या ठिकाणी अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, हरिनगर परिसरातील नाल्यांची नियमित सफाई केली जात असली, तरी पुढे कल्याणीनगरमधील नाल्यांची प्रभावी साफसफाई होत नसल्याचा आरोप आहे. याशिवाय, काही ठिकाणी नाला ''ओपन टू स्काय'' नसल्याने मुसळधार पावसानंतर पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी बॅक मारून नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याची समस्या कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT