वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : पोल्ट्री व्यावसायिक वाहतूकदाराच्या कोंबड्यांच्या टेम्पोवर दरोडा टाकून अपहरण करणार्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून पाच जणांना अटक केली आहे.
वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे (32), रॉकी मोंटू शेख (22) सुखउद्दीन जलालुद्दीन शेख (22), देविदास संतोष काकडे (31) व वैभव लक्ष्मण कांबळे (20, सर्व रा. चिखली पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सत्यम रमेश राठोड (19) हा अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.30) रोजी कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोल्ट्री व्यावसायिकाच्या कोंबड्या वाहून घेऊन जाणार्या टेम्पोला गाडी आडवी लावून टेम्पो ड्रायव्हरला मारहाण करून अज्ञात 4 ते 5 व्यक्तींनी टेम्पो व त्यातील सुमारे 1442 जिवंत कोंबडया, तसेच फिर्यादी यांचे 3 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण 12 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालाची जबरी चोरी
केली होती.
दरम्यान, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक उपनिरीक्षक शब्बीर पठाण, प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार राजू मोमीन,
चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, पुनम गुंड यांनी या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली..