वडगाव काशिंबेग: गणपतीची फक्त सोंड असणारे भारतातील एकमेव मंदिर File Photo
पुणे

Vadgaon Kashimbeg: पुण्याजवळचे गणपतीची फक्त सोंड असणारे भारतातील एकमेव मंदिर,थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नीही होत्या भक्त

shreekshetra vadgaon kashimbeg: मंदिराला मिळालेल्या ब्रिटिशकालीन सनदेची छायांकित प्रत.

पुढारी वृत्तसेवा

Ganpati Temples in Pune

मंचर: आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे गणपतीची फक्त सोंड असणारे भारतातील एकमेव असे स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती मंदिर आहे. गणपतीची अष्टविनायक यात्रा करताना या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा सफल होत नाही, अशी आख्यायिका असल्याने या गणपती मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मंचर-श्रीक्षेत्र भीमाशंकर मार्गावर मंचरपासून फक्त चार किलोमीटर पुढे गेल्यावर अर्धपीठ मोरया गणपतीचे श्रीक्षेत्र असणार्‍या वडगाव काशिंबेग गावाकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरून फक्त दोनच किलोमीटर अंतरावर निसर्गसंपन्नतेने नटलेले वडगाव काशिंबेग गाव आहे. याच गावच्या दक्षिणेकडील डोंगराच्या एका खडकात स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीचे हेमाडपंती पद्धतीच्या बांधणीचे छोटेसे मंदिर आहे. (Latest Pune News)

या मंदिरात गणेशाची फक्त सोंडच पाहायला मिळते. त्यामुळेच या गणपतीला स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती म्हणून ओळखले जाते. गणपतीची फक्त सोंड असलेली ही देशभरातील एकमेव गणेशमूर्ती आहे. येथील गणपती मंदिराचा पुराणात ‘मोरया’ या नावाने उल्लेख आढळतो, तर पेशवेकालीन दफ्तरातही या मंदिराचा अल्लेख आढळत असून, स्वतः पेशवे या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत होते.

या गणपतीचे विशेष म्हणजे हा गणपती फक्त सोंडरूपी असून, ही सोंड स्वयंभूपणे प्रगट झालेली आहे. येथे प्रगट झालेली गणपतीची सोंड उत्तराभिमुख आहे. मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याचे काम येथील देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

येथील मंदिरात वेगवेगळे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करून भाद्रपदातील गणेशोत्सवही दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शासनाने या देवस्थानाला सन 2005 साली ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत.

मंदिराला इतिहासात महत्त्वाचे स्थान

थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई या स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीच्या भक्त होत्या. स्वतः पेशवे या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याने पेशव्यांनी या देवस्थानासाठी विशेष निधीची तरतूद केली होती. या मंदिराच्या तेलवातीसाठी स्वतः पेशवे देणगी दरवर्षी देत होते. पेशवाईच्या समाप्तीनंतर पेशवे काळात ज्या ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामे दिली होती, ती इनामे व शाही खजिन्यातून दिली जाणारी मदत इंग्रजांनीही पुढे चालू ठेवली होती.

इंग्रजांनी दिलेली सनद उपलब्ध

पेशवेकाळात दिलेली इनामे तपासणीसाठी ब्रिटिशांनी सन 1852 मध्ये इनाम कमिशन नेमले होते. ब्रिटिशांच्या या इनाम कमिशनने वडगाव काशिंबेग मंदिराचे पेशवेकालीन दस्तऐवज तपासले. त्या आधारे ब्रिटिशांनी दि. 15 एप्रिल 1875 रोजी सनद देऊन या गणपती मंदिरास दरवर्षी एक रुपया मदत सुरू केली. ब्रिटिशांनी 15 एप्रिल 1875 रोजी या मंदिराला दिलेली सनद मोडी लिपी आणि इंग्रजीमध्ये आहे. ही सनद या गणपती देवस्थानकडे उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT