कोरेगाव भीमा: वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) गावचे पोलिस पाटील नितीन संभाजी ढोरे यांनी आर्थिक दुर्बल घटकात नसतानादेखील मालमत्तेची माहिती न देता पोलिस पाटील पदाचा लाभ घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे नितीन ढोरे यांचे पोलिस पाटील पद रद्द करण्यात आल्याचे आदेश शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिले आहेत.
वाडा पुनर्वसन गावचे पोलिस पाटील पद आर्थिक दुर्बल घटक व मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले असताना गावातील नितीन ढोरे यांनी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज दाखल करुन पोलिस पाटील पदावर स्थान मिळवले होते.(Latest Pune News)
मात्र आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीची जमीन पाच एकरचे आत असणे, महानगरपालिका हद्दीमध्ये जमीन असल्यास एक गुंठा तसेच बांधकाम एक हजार स्केअर फूट असावे, तसेच वार्षिक उत्पन्न आठ लाखाचे आत असणे गरजेचे असताना नितीन ढोरे यांच्या नावे वाडा पुनर्वसनसह खराडी, कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी या वेगवेगळ्या भागामध्ये जमीन, मिळकत व बांधकाम असल्याची तक्रार करत त्यांचे पोलिस पाटील रद्द करण्याची मागणी संदेश ज्ञानेश्वर सावंत यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी चौकशी करत सुनावणी घेतली असताना तक्रारदार संदेश सावंत यांच्या वतीने ॲड. नितीन निसर्गन यांनी काम पहिले; मात्र पोलिस पाटील नितीन ढोरे काही वेळा गैरहजर राहिले तर तहसीलदार यांनी याबाबत सुनावणी घेत पोलिस पाटील नितीन ढोरे यांचे पद रद्द करत असल्याचे आदेश दिले. त्याबाबतचे पत्रदेखील पोलिस निरीक्षक शिक्रापूर व ग्राम महसूल अधिकारी कोरेगाव भीमा यांना दिले आहे.
पती पोलिस पाटील तर पत्नी सरपंच
पोलिस पाटील हे प्रशासकीय पद असताना पोलिस पाटील यांना राजकीय लाभ घेता येत नाहीत किंवा राजकारणात सक्रिय राहता येत नाही; मात्र वाडा पुनर्वसनचे सरपंचपद खुल्या गटासाठी आरक्षित असताना सध्या आर्थिक दुर्बल घटकातून पोलिस पाटील असेलल्या नितीन ढोरे यांची पत्नी खुल्या गटातून आरक्षित जागेवर वाडा पुनर्वसन ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर कार्यरत आहेत.
या आदेशाची प्रत मला अद्याप मिळालेली नाही. आदेशाबाबत मी वरिष्ठ पातळीवर अपील करणार आहे.- नितीन ढोरे, पोलिस पाटील, वाडा पुनर्वसन