पुणे : ‘परिस्थिती कशीही असो, कितीही संकटे समोर असोत. त्याला पाठ दाखवून पळू नका. ती संधी म्हणून बघा. त्याचा सामना करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल,’ असे मत भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले.
खेळामध्ये यशस्वी कारकिर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वात आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे असा मार्मिक सल्ला व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने उदयोन्मुख खेळाडूंना दिला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या वतीने विंचूरकर पॅव्हेलियनच्या नूतनीकरण वास्तूचे, प्रवेशद्वाराचे व पुतळ्याचे औपचारिक उदघाटन व अनावरण पद्मश्री पुरस्कार विजेते व माजी भारतीय क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या हस्ते करण्यात आले. देवधर परिवारापैकी डॉ. दिपक आठवले, वृषाली आठवले आणि आदित्य पावनगडकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दिपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू, माजी रणजीपटू सुरेंद्र भावे, माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अविनाश रानडे, तन्मय आगाशे, सिद्धार्थ भावे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, शिरीष साठे, आमोद प्रधान, महेंद्र गोखले, निरंजन गोडबोले, विनायक द्रविड, ज्योती गोडबोले, संयोगिता मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांनी ५० वर्षीय लक्ष्मण यांची मुलाखत घेतली. त्यावेळी लक्ष्मण यांनी आपली क्रिकेट कारकीर्द उलगडून दाखवली. त्याचसोबत क्रिकेटने आपल्या आयुष्यात कसे धडे दिले तो प्रवासही उलगडला.
ते म्हणाले, ‘लहाणपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. माझे आई-वडील डॉक्टर होते. कारकीर्द म्हणून क्रिकेट निवडण्यासाठी त्यांनी मला पाच वर्षे दिली. या पाच वर्षात यश मिळाले नाही, तर मलाही डॉक्टरीपेशाकडे वळावे लागणार होते. मात्र, मी मेहनत घेतली. मी किती धावा केल्या हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेत होते, याला माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला.’
ते म्हणाले, ‘माझे रणजी पदार्पण निराशाजनक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. निवड समितीला सल्ला देताना ते म्हणाले, की खेळाडूंमधील कौशल्य बघायला शिकले पाहिजे. त्याला पाठिंबा दिला पाहिजे. सचिन तेंडुलकरसारख्या व्यक्ती माझ्या आयुष्यात होत्या. त्यामुळेच ही कारकीर्द घडू शकली.
लक्ष्मण म्हणाले...
जो चेंडू टाकला गेला, तो इतिहास होतो. त्यामुळे वर्तमानात जगा.
अशक्य काहीही नसते. फक्त शक्य करून दाखविण्याची तयारी असायला हवी.
आयुष्य प्रत्येक क्षणी तुमची परीक्षा बघेल.
आयुष्यात अनेक अडथळे येतील. त्यांचा सामना करण्याची हिंमत असायला हवी.
यासाठी तुम्ही स्वता:शी प्रमाणिक राहा.
छोटी स्वप्ने न बघता, मोठी स्वप्न बघा. ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा.