पुणे : 13 व्या ‘व्हिएसएन सीए क्रिकेट लीग’ स्पर्धेत आकाश कोयले याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या मदतीने व्हीएसएन सुपरकिंग्ज संघाने गतविजेत्या बीस्मार्ट संघाचा 23 धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत व्हीएसएन सुपरकिंग्ज संघाने 10 षटकांमध्ये 6 गडी गमावून 103 धावांचे आव्हान उभे केले. तन्मय सी. याने 30 धावा, किरण गोरगोटे याने 32 धावा आणि आकाश कोयले याने 22 धावा यांनी धावांचे योगदान देत संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. गोलंदाजीमध्ये बीस्मार्टच्या यश शहा आणि शुभांक शहा यांनी एकेक गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बीस्मार्ट संघाचा डाव 80 धावांवर मर्यादित राहिला.
प्रथमेश शिरसाट (26 धावा) आणि साहील पारख (21 धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. पण व्हीएसएनच्या आकाश कोयले याने 12 धावांत दोन गडी, तर सचिन भट आणि प्रवीण नलावडे यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद करून संघाचा विजय साकार केला. बीस्मार्ट संघाने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत दाखल झाला होता, पण विजेतेपद कायम ठेवण्याचे त्यांचे स्वप्न व्हीएसएन सुपरकिंग्ज संघाने पूर्ण होऊ दिले नाही.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण राम वाघमोडे, अनुज छाजेड आणि रोहन छाजेड, सेंट्रल बँकेचे नरेश जाधव आणि अंगद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या व्हीएसएन सुपरकिंग्ज आणि उपविजेत्या बीस्मार्ट संघाला करंडक आणि मेडल्स देण्यात आली.