पुणे

इंग्लंडमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन; ’साडी वॉकेथॉन’मध्ये महाराष्ट्रातील 50 महिलांचा सहभाग

अमृता चौगुले

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंग्लंडमधील लंडन येथे प्रथमच 'साडी वॉकेथॉन' उत्साहात पार पडली. नुकत्याच आयोजित केलेल्या या वॉकेथॉनमध्ये महाराष्ट्रातील 50 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नऊवारी साडी व नाकामध्ये नथ परिधान करून महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन तेथील नागरिकांना घडविले.

'ब्रिटिश वूमन इन सारी'च्या डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनमध्ये भारतातील 600 महिलांचा सहभाग होता. विविध राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषा करून लंडनमधील ऐतिहासिक ट्रॅफल्गार स्क्वेअर येथे जमल्या होत्या. महाराष्ट्रातील महिलांनी पारंपरिक लावण्यांसह विविध गीतांचे सादरीकरण केले. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात या वॉकथॉनचा प्रारंभ करण्यात आला.

पुण्यातील अनुजा हुडके जाधव, सोनिया गोखले व मुंबईतील रमा कर्मोकर, किरण चितळे यांनी या वॉकथॉनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातील महिलांनी राज्यातील हस्तकलांचे या वेळी दिमाखदार प्रदर्शन केले. पैठणी, नारायण पेठ साडी, खणाचे ब्लाऊज, कोसा सिल्क, पारंपरिक दागिने, नऊवारी साडी, फेटा आदी परिधान करून या महिला वॉकथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT