Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला महामंडळाच्या चार घटक संस्थांसह संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विविध संस्थांनी सूचवलेल्या नावावर चर्चा झाली. विश्वास पाटील यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली. त्यांनी मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करुन संमेलन अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथील शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होणार आहे.
लोकप्रिय कादंबरीकार अशी विश्वास पाटील यांची मराठी साहित्यामध्ये ओळख आहे. आपल्या कसदार लेखनीतून त्यांनी सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांचा वेध घेतला. पानिपत कादंबरीतून त्यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची, धोरणांची आणि पराभवाची हृदयस्पर्शी कथा मांडली. ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी ठरली आहे. झाडाझडती कादंबरीतून त्यांनी धरणग्रस्तांच्या आयुष्याची फरफट मांडली. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रमुखी कादंबरीतून मांडलेली प्रेमकथा ही सामजिक वास्तवाचे भान करुन देणारी ठरली. संभाजी कादंबरीमधील त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे घडवलले दर्शनही वाचकांना भावलं.
१ ते ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. ग्रंथडिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून, त्या दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कविकट्ट्याचे आणि बालकुमारांसाठी आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस लाभ घेता येणार आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानांतर्गत विविधांगी न्याय्य दिल्या जाणार आहेत. निमंत्रितांची कोमल संमेलन, संमेलनाच्या गाजलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, कवी संमेलन, कादंबरी कार्यशाळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सर्व पदाधिकाऱ्यांना, संमेलन सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.