वडगाव शेरी / पुणे : पालिकेच्या ‘विश्वास 2025’ मोहिमेअंतर्गत शहरातील स्वच्छता व्यवस्थेत बदल केला आहे. या मोहिमेअंतर्गत कचरावेचकांकडून कचरासंकलन करण्याऐवजी घंटा गाड्याद्वारे कचरासंकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमाननगर परिसरात ही मोहीम सुरू केली असून, परिसरातील कचरावेचकांना कसलीही पूर्वसूचना न देता कचरा संकलनाचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील 60 कचरावेचकांसह शहरातील तब्बल चार हजार कचरावेचकांवरउपासमारीचे संकट आले आहे. (Pune latest News)
पालिकेने कचर्याची समस्या सोडवण्यासाठी विश्वास 2025 ही मोहीम सुरू केली आहे. ही योजना सुरू करण्यापूर्वी पालिका आयुक्त आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यात झालेल्या बैठकीत कचरावेचकांना नवीन प्रस्तावित व्यवस्थेत समाविष्ट करून घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, योजना सुरू झाल्यानंतर कोणतेही पूर्वसूचना न देता कचरावेचकांचे काम बंद करण्यात आले आहे. यामुळे विमाननगरमधील 60 ते 70 कचरावेचकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत विमाननगरमधील कचरावेचक कामगार भिकाजी लोंढे म्हणाले, “मी दररोज 150 घरांमधून दारोदारी जाऊन कचरा घेत आहे; पण अचानक 1 तारखेपासून गाडी यायला सुरुवात झाली, माझं काम एका दिवसात बंद करण्यात आलं. कचरावेचकाच्या कामातून मिळणार्या पैश्यातून मी माझ्या कुटुंबाला सांभाळत होतो. पण, आता माझ काम अचानक गेल्याने माझ्यावर आर्थिक संकट कोसळणार आहे. कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.”
याबाबत स्वच्छ संस्थेचे बोर्ड मेंबर राणी शिवशरण यांनी सांगितले की, पालिकेने कचरावेचकांना विश्वास 2025 मोहिमेमध्ये सामावून घेतले पाहिजे. या योजनेमुळे शहरातील 4000 कचरावेचकांचेही भवितव्य धोक्यात आहे. प्रशासनाने बैठकीत दिलेले आश्वासन तत्काळ अंमलात आणावे. पालिकेच्या अधिकार्यांनी सोशल मीडियावर कचरावेचकांचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या उपजीविकेला गदा घालणारी धोरणे राबवली जात आहेत.
यासंदर्भात नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहा. आयुक्त शीतल वाकडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी फोन घेतला नाही. याबाबत विमाननगर भागातील आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे यांनी सांगितले की, विमाननगर भागात 15 गाड्या सुरू केल्या आहेत. यापुढे घंटागाड्यांनी कचरा गोळा करण्याचे आदेश आले आहे. तुम्हाला अधिक माहिती वरिष्ठ सांगतील, मला जास्त माहित नाही.
यापूर्वी पाच सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या बैठकीत कचरावेचकांना नव्या व्यवस्थेत समाविष्ट करून घेतले जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी दिले होते. अधिकृत सोशल मीडिया व्यासपीठ ‘पीएमसी केअर’ वरूनही ही माहिती प्रसारित झाली होती. मात्र प्रत्यक्षात विमाननगर भागात कचरावेचकांना डावलून, घंटागाड्यांनी थेट संकलन सुरू केले आहे.