

सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज
बचाव पक्षाने घेतली हरकत
स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर बदनामी खटला प्रकरण
पुणे : राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाचा यूट्युबवरील व्हिडीओ डिलीट करू नये, यासाठी दाखल केलेल्या अर्जावर बचाव पक्षाच्या हरकतीनंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. या अर्जावर विशेष न्यायालयात आता पुढील सुनावणी 22 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. हा खटला सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी दाखल केला आहे. (Latest Pune News)
सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करताना म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेले बदनामीकारक भाषण यूट्युबवर उपलब्ध आहे. या संदर्भात विश्रामबाग पोलिसांनी अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीला समन्स पाठवून तांत्रिक तपास केला होता. मात्र, त्याचा अहवाल अद्याप न्यायालयात दाखल नाही. त्यामुळे हा अहवाल मागवावा, तसेच संबंधित भाषणाचा व्हिडीओ यूट्युबवरून डिलीट किंवा काढून टाकू नये, असे आदेश न्यायालयाने द्यावेत. मात्र, राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी या मागणीस हरकत घेतली.
या टप्प्यावर पोलिसांकडून अहवाल मागविण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर हा फौजदारी खटला असून दिवाणी दावा नसल्याने यूट्युबवरील व्हिडीओ डिलीट करू नये, असे मनाई आदेश देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा दावा अॅड. पवार यांनी केला. त्यामुळे सात्यकी सावरकर यांचा अर्ज चुकीचा व कायद्याच्या तरतुदींनुसार ग्राह्य नसल्याचे त्यांनी सांगितले.