वेल्हे (पुणे ): पुढारी वृत्तसेवा : धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिमीने पाणीसाठ्यात किंचित वाढ सुरू आहे. पानशेत धरण 100 टक्के भरल्याने वांजळवाडी सांडव्यातून 600 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 26.55 टीएमसी म्हणजे 91.07 टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत, वरसगाव खोर्यात रिमझिम सुरू आहे. खडकवासला, सिंहगड भागात तुरळक अपवाद वगळता उघडीप आहे. असे असले तरी पानशेत-वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्यालगतच्या पट्ट्यात उघडिपीनंतर पावसाची रिमझिम सुरू आहे. गेल्या दोन ते दहा दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे.
त्यामुळे धरण साठ्यातील वाढ मंदावली आहे. रिमझिमीने पानशेत, वरसगाव टेमघरमध्ये थोडीफार भर पडत आहे. खडकवासला धरणात पाण्याची आवक अतिशय अल्प आहे. धरणातून शेती व पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने पाण्याची पातळी कमी होत आहे. खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास अडीच टीएमसी कमी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 16 ऑगस्ट 2022 रोजी धरणसाखळीत 28.72 टीएमसी म्हणजे 99.20 टक्के पाणी होते.
पानशेत शंभर टक्के भरल्याने वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून पाणी सोडले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. 15) रात्री साडेआठ वाजता वीजनिर्मिती प्रकल्पात बिघाड झाल्याने विसर्ग बंद करण्यात आला. त्यामुळे मध्यरात्रीपासून वांजळवाडी सांडव्यातून पाणी सोडले जात आहे.
– अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण प्रकल्प
हेही वाचा :