पुणे: विमाननगरमधील यमुनानगर वस्तीतील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. पाणी नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी (दि.22) सकाळी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सिम्बॉयसिस कॉलेजजवळील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांनी कपडे आणून धुतले. या सोबतच रस्त्यावरच अंघोळ करत प्रशासनाचा निषेध केला. या वेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण सिम्बॉयसिस रस्ता बंद केला.
स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “दरवेळी पाणी येईल असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात पाणी येतच नाही. अनेकदा रात्री 1-2 वाजता पाणी भरावे लागते. मग रात्रभर पाण्यासाठी जागायचे की दिवसभर काम करायचे, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो. (Latest Pune News)
विमाननगर हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो, पण यमुनानगर वस्ती मात्र दुष्काळासारखी परिस्थिती भोगत आहे. खड्डे खोदून त्यातून पाणी साठवणे, ही लाजिरवाणी बाब आहे.” स्थानिकांनी हेही नमूद केले की, “शहरात सर्वाधिक कर भरूनही पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. गेल्या पाच वर्षांत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी काहीही केले नाही.”
या आंदोलनात महिलांनी रिकाम्या बादल्या घेऊन घोषणाबाजी केली. काही महिलांनी लहान मुलांना घेऊन रस्त्यावर बसून निषेध व्यक्त केला. “आमच्या वस्तीत स्वयंपाक, स्वच्छता, रोजच्या गरजा सर्व ठप्प झाल्या आहेत. प्रशासनाकडे वारंवार धाव घेतली तरी काहीच फरक पडत नाही,” असे नागरिकांनी सांगितले. जर तातडीने पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर आणखी तीव आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील या वेळी नागरिकांनी दिला.