Waste Segregation Pudhari
पुणे

Viman Nagar Waste Mafia Allegation: विमाननगरमध्ये कचरा माफियांचा प्रकार? खासगी वाहतूकदारांकडून पैसे घेऊन कचरा उचलण्याचा आरोप

महापालिकेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; पकडलेल्या गाडीवर तीन महिन्यांनंतरही कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

वडगाव शेरी: विमाननगर परिसरात महापालिकेची कचरा संकलन यंत्रणा कार्यरत असतानाही खासगी कचरा वाहतूकदारांकडून (कथित कचरा माफिया) हॉटेल व्यावसायिक व मोठ्या सोसायट्यांकडून पैसे घेऊन कचरा उचलला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा कचरा नंतर महापालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रात किंवा पालिकेच्या वाहनांमध्ये टाकला जात असल्याने संबंधित खासगी वाहतूकदार दरमहा लाखो रुपयांची कमाई करीत असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणातील एका खासगी कचरा वाहतूकदाराची गाडी २४ मार्च रोजी नगर रोड- वाघोली क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकांनी पकडली होती. मात्र, तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही संबंधितावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाने संबंधिताला अभय दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

महापालिका विमाननगर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. नागरिक व व्यावसायिकांकडून ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्यांमार्फत कचरा वर्गीकरण केंद्रात नेण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही प्रत्यक्षात अनेक हॉटेल्स व मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधून महापालिकेच्या गाड्या नियमितपणे कचरा उचलत नसल्याची तक्रार आहे. या परिस्थितीचा फायदा घेत खासगी कचरा वाहतूकदार संबंधित व्यावसायिकांकडून दरमहा सुमारे ३० ते ५० हजार रुपये आकारून कचरा गोळा करतात. त्यानंतर तोच कचरा महापालिकेच्या व्यवस्थेमध्ये जमा केला जातो. महापालिका मोफत देत असलेल्या सेवेकरिता व्यावसायिकांकडून मोठी रक्कम वसूल केली जात असल्याने आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

२४ मार्च रोजी संबंधित खासगी कचरा वाहतूकदाराची गाडी आरोग्य निरीक्षकांनी पकडली होती. मात्र, राजकीय दबावामुळे कोणतीही दंडात्मक कारवाई न करता गाडी सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू असल्याचे सांगितले. परंतु, आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय किंवा कारवाई झालेली नाही.

प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संबंधित खासगी कचरा वाहतूकदाराने विमाननगर परिसरातील कॅफे, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या हॉटेल्समधून पैसे घेऊन कचरा उचलण्याचा व्यवसाय अधिक वेगाने सुरू ठेवल्याचा आरोप आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि व्यावसायिकांची आर्थिक लूट सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

वरिष्ठांच्या सूचनांची प्रतीक्षा

खासगी कचरा वाहतूकदारावरील कारवाईबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती नगर रोड- विमाननगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळे यांनी दिली.

घटनाक्रम

  • २४ मार्च : खासगी कचरा वाहतूकदाराची गाडी आरोग्य निरीक्षकांनी पकडली.

  • एप्रिलचा पहिला आठवडा : गाडी पकडल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

  • त्यानंतर : सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली.

  • २८ एप्रिल : सहायक आयुक्तांनी कारवाईबाबत आरोग्य निरीक्षकांकडून माहिती घेणार असल्याचे सांगितले.

  • २५ मे : काँग्रेसच्या वतीने आंदोलन; कारवाईचे आश्वासन.

  • १ जुलै : तीन महिन्यांनंतरही संबंधित खासगी कचरा वाहतूकदारावर कोणतीही कारवाई नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT