

पुणे: एखादे स्वप्न मनात जिवंत असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी वय कधीच आड येत नाही. पुण्यातील ज्येष्ठ चित्रकार शोभा भूत यांनी हे आपल्या आयुष्यातून सिद्ध करून दाखवले आहे. लहानपणापासून असलेली चित्रकलेची ओढ संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक वर्षे मागे पडली. मात्र, श्रीगणेशावरील अपार श्रद्धा आणि चित्रकलेची आवड यांचा सुंदर संगम घडला तो १९९३ च्या गणेश चतुर्थीला. त्या दिवसापासून सुरू झालेली त्यांची श्रीगणेशचित्रांची साधना आजही वयाच्या ८४ व्या वर्षी तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांत त्यांनी तब्बल २५ हजारांहून अधिक वेगवेगळ्या स्वरुपातील श्रीगणेशाची चित्रे साकारली असून, त्यातील निवडक कलाकृतींचे पहिलेच ‘लंबोदर पितांबर’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. शोभा भूत यांना लहानपणापासून चित्रकलेची विशेष आवड होती. मात्र, दहावीनंतर विवाह झाल्याने संसाराची जबाबदारी सांभाळताना ही आवड मागे पडली.
स्वतःची अपुरी राहिलेली इच्छा त्यांनी मुलगी शीला देशपांडे यांना फाइन आर्ट्सचे शिक्षण देऊन पूर्ण केली. मुलगी चित्रकलेचे शिक्षण घेत असताना विविध रंगसंगती, माध्यमे आणि चित्रशैली यांचे ज्ञान त्यांनीही आत्मसात केले आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. आजही त्यांच्या हातात पेन्सिल, स्केचपेन किंवा ब्रश आला की, कागदावर सहजपणे गणपती बाप्पाचे रूप साकार होते. स्केचपेन, पेन्सिल, जलरंग, ऑईल पेंट यांसह त्यांनी अनेक वस्तूंवर श्रीगणेशाची चित्रे रेखाटली आहेत.
विशेष म्हणजे त्यांच्या २५ हजार चित्रांपैकी एकही गणपती दुसऱ्यासारखा नाही. प्रत्येक चित्रातील मुद्रा, डोळे, अलंकार, रंगसंगती आणि भाव वेगळे आहेत. हीच त्यांच्या कलेची खरी ओळख ठरली आहे. ‘चित्र काढताना मी पूर्णपणे तल्लीन होते. त्या क्षणी बाकीचे जग विसरून जाते. मी श्रीगणेशाची भक्त आहे. त्यांचे चित्र साकारल्यानंतर मनाला आनंद मिळतो. वयोमानामुळे आता दृष्टी कमी झाली असली, तरी चित्र काढण्याची ऊर्जा आणि इच्छा आजही तितकीच आहे,’ असे शोभा भूत यांनी सांगितले.
या प्रदर्शनामागे त्यांची कन्या आणि फाइन आर्टिस्ट शीला देशपांडे यांचा मोठा पुढाकार आहे. ‘आईने काढलेली हजारो चित्रे घरातच जपून ठेवली होती. इतका मोठा कला ठेवा रसिकांसमोर यायलाच हवा, या भावनेतून प्रदर्शनाचे स्वप्न पाहिले. आज ते प्रत्यक्षात साकार झाल्याचा आनंद आहे,’ असे त्या सांगतात. त्यांचे प्रदर्शन रविवार (दि. ५ जुलै) पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.