संतोष निंबाळकर
धानोरी: विमाननगर-वाघोली या प्रभाग क्र. 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचे डॉ. श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे व रामदास दाभाडे हे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे प्रभागात शत-प्रतिशत भाजप असे चित्र निर्माण झाले असून, भाजपने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यापासूनच विमाननगर-लोहगाव हा प्रभाग (क्र. 3) चर्चेत यायला सुरुवात झाली होती. तुतारीचे आमदार बापूसाहेब पठारे आणि घड्याळाचे हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांच्यामध्ये झालेले हाणामारीचे प्रकरण, आमदारपुत्राचा भाजपप्रवेश, लोहगाव व वाघोलीकरांनी निवडणूकपूर्व काळात केलेला खर्च, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि निवडणुकीदरम्यान झालेले पैशांचे वाटप अशा विविध कारणांमुळे हा प्रभाग निवडणुकीच्या निकालापर्यंत चर्चेत राहिला होता.
प्रभागरचना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच कमी मतदारसंख्या असलेल्या वाघोलीतील रामदास दाभाडे, अनिल सातव व इतर इच्छुकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विकासकामे, गणेशोत्सव आणि देवदर्शन यात्रांच्या माध्यमातून प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून मतांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली होती. तसेच, मागील काही वर्षांपासून विमाननगर, सोमनाथनगर भागातील सुरेंद्र पठारे यांच्या जनसंपर्काचा फायदा ऐश्वर्या पठारे व भाजपच्या इतर उमेदवारांना झाल्याचे दिसून आले. लोहगावचे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे यांच्या जनसंपर्काचाही भाजपला फायदा झाला. राष्ट्रवादी काँग््रेासने अनिल सातव व प्रीतम खांदवे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न फसल्याने राष्ट्रवादीने लोहगावमधून बंडू खांदवे, सुनील खांदवे व उज्ज्वला खांदवे हे तीन उमेदवार दिले होते. चंदननगर परिसरातील उषा कळमकर या राष्ट्रवादीच्या चौथ्या उमेदवार होत्या.
राष्ट्रवादीकडून वाघोलीला प्रतिनिधित्व न मिळाल्याने वाघोली परिसरात नाराजी होती. वाघोलीतील रामदास दाभाडे व अनिल सातव यांनी महिला उमेदवार नाकारून स्वतःच्याच उमेदवारीसाठी हट्ट केल्याने ऐनवेळी सुरेंद्र पठारे यांना प्रभाग तीनऐवजी प्रभाग चारमधून लढावे लागले. त्यामुळे सुरेंद्र पठारे यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे या प्रभाग तीनमध्ये क गटातून लढल्या. भाजपने लोहगावमध्ये सुमारे चाळीस हजार मतदारसंख्या असतानाही डॉ. श्रेयस खांदवे या एकमेव उमेदवार दिल्या होत्या. (विमाननगरसारख्या उच्चभ्रू परिसरात भाजपच्या उमेदवार डॉ. श्रेयस खांदवे आणि ऐश्वर्या पठारे मतदारांशी इंग््राजीमध्ये संवाद साधताना दिसत होत्या. आमदार पठारे व बंडू खांदवे यांच्यातील मारामारीमुळे खांदवे यांच्यासाठी निर्माण झालेली सहानुभूती शेवटपर्यंत टिकली नाही.)
टीका आणि ट्रोलिंगचे बूमरँग
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र व सुनबाई भाजपकडून लढत होते. त्यामुळे आमदार पठारे प्रचारात दिसत नव्हते. यावरून राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार गट) आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आमचे आमदार कुठे दिसले तर सांगा, अशी उपरोधिक टीका आमदार पठारे यांच्यावर केली होती. तसेच, पठारे परिवाराला एआयच्या साहाय्याने व्हिडीओ बनवून संपत्ती व दादागिरी अशा मुद्द्यांंवरून ट्रोल करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, त्यावर आमदार पठारे किंवा सुरेंद्र पठारे यांनी आक्रमक प्रतिसाद न दिल्याने या टीका आणि ट्रोलिंगचे बूमरँग झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीच्या दोन गटांत खरी लढत
आमदारपुत्र सुरेंद्र पठारे व इतर काहीजणांच्या भाजप प्रवेशापूर्वी लोहगावमध्ये झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार पठारे म्हणाले होते की, ‘जनतेच्या फायद्यासाठी तुम्ही सरकारसोबत (भाजप) जायचे ठरविले आहे. तुमच्या विचाराला माझा पाठिंबा आहे. इथूनपुढे तुमच्यासाठी सार्वजनिक व्यासपीठावर असे भाषण करता येणार नाही. पण, एकत्र बसून तुम्हाला कशी मदत करता येईल ते पाहू’. त्यानंतर निवडणूक प्रचारात आमदार पठारे दिसले नव्हते. त्यातच ऐनवेळी दोन्ही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी भाजपमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांविरोधात लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच भाजपची ताकद कामाला आली. निवडणुकीनंतर मात्र आमदार पठारे व भाजपचे नवनियुक्त नगरसेवक सार्वजनिक ठिकाणी एकत्र काम करताना दिसत आहेत.