ग्रामस्थांचा महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांना घेराव Pudhari
पुणे

Manchar: ग्रामस्थांचा महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांना घेराव

कळंब येथे अवकाळी पावसामुळे नुकसान नागरिकांनी व्यक्त केला संताप

पुढारी वृत्तसेवा

मंचर: कळंब (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 20) सायंकाळी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे इंदिरानगर, वर्पेमळा व भवानी माता मंदिर परिसरात शेत, घरे व गोठ्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 21) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिलीप शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी पाहणी केली असता ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला.

ग्रामस्थांनी पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खेड-सिन्नर रस्त्याच्या दुतर्फा सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार व सेवा रस्त्याची योग्य व्यवस्था न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाचे पाणी घरात व गोठ्यात घुसल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. (Latest Pune News)

याप्रकरणी शिंदे यांनी दोन्ही बाजूंनी सेवा रस्ता व सांडपाणी गटाराची आखणी झाली असून लवकरच कामास सुरुवात होईल असे आश्वासन दिले. मात्र, वर्पेमळा बाजूच्या 17 बाधित शेतकर्‍यांनी या रस्त्याला विरोध दर्शविला असून, अधिक मोबदला व इतर नुकसान भरपाई मिळेपर्यंत कामाला विरोध कायम राहील असे स्पष्ट केले.

ग्रामपंचायत व स्थानिक नेत्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बस थांबे, गतिरोधक, संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी केली. तसेच, काम सुरू करण्याआधी प्राधिकरण व बाधित शेतकर्‍यांमध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत, असे मत माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, कमलेश वर्पे, तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव, सुनील भालेराव,युवासेना अध्यक्ष सुमित वर्पे,प्रमोद पिंगळे,ऋषिकेश वर्पे,अमित वर्पे,प्रथमेश वर्पे,दत्ता भालेराव,कैलास भालेराव,राजेंद्र भालेराव, सार्थक भालेराव, स्वप्निल भालेराव व इतरांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT