'माझा गाव माझा स्वाभिमान' केवळ पोकळ वल्गना; ’धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अ‍ॅडमिनची स्थिती File Photo
पुणे

Purandar: 'माझा गाव माझा स्वाभिमान' केवळ पोकळ वल्गना; ’धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अ‍ॅडमिनची स्थिती

‘माझा गाव माझा स्वाभिमान’ अशा पोकळ वल्गना देणारे काही सोशल समाजसेवक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केवळ मत प्रदर्शित करतात

पुढारी वृत्तसेवा

शिवदास शितोळे

परिंचे: आज गावागावांत विविध नावांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सुरू आहेत. काही गावांमध्ये हे ग्रुप्स विधायक कामे करत असले, तरी अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपवर वैयक्तिक हेवेदावे आणि मत्सर याचेच ओंगळवाणे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अनेक ग्रुप्स गावाच्या, देवाच्या नावावर, तसेच ‘बालमित्र’, ‘तरुण मित्र’, ‘भावकी’, ‘गावकी’ अशा विविध नावांनी चालू आहेत. यातील बहुतांश ग्रुप्सवर फक्त शुभ सकाळ, शुभ रात्री, वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावपूर्ण श्रद्धांजली, विवाह, मुंज, बारसे यांसारख्या पोस्ट्सचा भडीमार असतो.

गावातील एखाद्या ग्रुपवर सर्व जातीधर्मांचे सदस्य असले तरी, एकोप्याने राहण्याऐवजी परस्पर मतभेदच मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. एकूणच यामुळे ‘माझा गाव माझा स्वाभिमान’ ही केवळ पोकळ वल्गना ठरू लागली आहे. (Latest Pune News)

‘माझा गाव माझा स्वाभिमान’ अशा पोकळ वल्गना देणारे काही सोशल समाजसेवक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केवळ मत प्रदर्शित करतात, परंतु गावातील विविध समस्यांविषयी त्यांची कायमच दातखिळी बसलेली असते. कारण गावातील लाईट, पाणी, आरोग्य, अवैध व्यवसाय, अतिक्रमण अशा विविध समस्यांविषयी ग्रुपवर टाकणे म्हणजे गावाची बदनामी होणे असा जावईशोध त्यांनी लावलेला असतो. खरंतर अशा लोकांना गावाच्या स्वाभिमानापेक्षा स्वतःचा अहंकार कुरवाळण्यातच जास्त आनंद असतो.

चुकून एखाद्या सदस्याने गावातील समस्यांविषयी ग्रुपवर प्रश्न मांडला तर त्याला एकटे पाडून सर्व बाजूंनी खच्चीकरण केले जाते आणि गावच्या बदनामीला तो कसा कारणीभूत आहे, असे मत प्रदर्शित करून एकमेकांची मने खराब करण्याचे काम ते करतात. त्यामुळे कित्येकदा ग्रुप अ‍ॅडमिनची दमछाक होते आणि ’धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी बिकट अवस्था होताना दिसते.

चमको नेत्यांचे चेले वरचढ. आज विविध गावांमध्ये आमदार, खासदार आल्यानंतर त्यांच्या पुढे पुढे करून, त्यांच्यासोबत फोटो काढून आम्ही कसे साहेबांच्या जवळचे आहोत, हे दाखवण्यासाठी गावातील नेत्यांचे चमको चेले प्रयत्नशील असतात. हेच चेले गावामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. ’उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी चमको चेल्यांची अवस्था असते. सर्वसामान्य नागरिक मात्र अशा वृत्तीच्या लोकांमुळे गावातील समस्या दिसत असतानाही मूग गिळून गप्प बसतात.

ग्रामसभा ही मिनी विधानसभा, पण...प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची ग्रामसभा असते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशीच्या ग्रामसभा सोडून इतर ग्रामसभांना नागरिकच काय तर ग्रामपंचायत सदस्यही दांडी मारतात. जर लोकांनी निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामसभेचे महत्त्व नसेल तर नागरिकांकडून काय अपेक्षा करणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

खरंतर ग्रामसभेत नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी संधी असते, परंतु अनेक नागरिक ग्रामसभेला जाणे टाळतात व सोशल मीडियावर आपली बाजू मांडतात. खरंतर ग्रामसभेने केलेला एखादा ठराव त्याला विधानसभेच्या ठरावाइतकेच महत्त्व असते. त्यामुळे गावातील चुकीच्या गोष्टींच्या विरोधात नागरिकांनी ग्रामसभेला उपस्थित राहून चुकीच्या गोष्टी बंद करण्याचा ठराव करण्याचा आग्रह करणे गरजेचे असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT