

तुषार मोढवे
कडूस: खेड तालुक्यातील कडूस गाव गेल्या दीड महिन्यात घडलेल्या तीन धक्कादायक हत्यांच्या घटनांमुळे हादरले आहे. ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कडूसमध्ये हत्येची पहिली घटना 24 एप्रिल रोजी घडली. कडूस गावाजवळील कुमंडला नदीपात्रात बाबाजी कालेकर यांचा मृतदेह तरंगताना आढळला. कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा आरोप केला असून, मारेकरी अद्याप मोकाट आहेत. (Latest Pune News)
पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेची अस्वस्थता कायम असतानाच 16 मे रोजी कडूसजवळील टाकेशेती परिसरात एका खासगी विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि हत्येचे कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या दोन घटनांनी गावातील भीतीचे सावट अधिक गडद केले असतानाच मंगळवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तिसरी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. गावठाण परिसरात संतोष बबन ढमाले यांची दोन तरुणांनी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली.
आपल्या मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी हा हल्ला केला. या घटनेने कडूस गावात संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
गुन्हेगारी वाढण्याची कारणे
चाकण औद्योगिक क्षेत्राच्या जवळ असल्यामुळे कडूस हे एक मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. औद्योगिक वसाहतीमुळे तरुणांच्या हातात पैसा खेळू लागल्याने व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी चायनीज हॉटेलच्या नावाखाली अवैधरीत्या दारू विक्रीचे धंदे वाढले असून, यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे चित्र आहे.
स्थानिकांची मागणी
पोलिस प्रशासनाकडे तातडीने तपास पूर्ण करण्याची, गस्त वाढविण्याची आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. एकेकाळी प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले कडूस गाव या सलग तीन हत्यांमुळे भीतीच्या छायेखाली आले आहे. सध्या गाव परिसरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सोशल मीडियावर स्टेट्स ठेवून गुन्हेगारी
कडूस परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून 18 ते 28 वयोगटातील तरुणाई गुन्हेगारीत अग्रभागी आहे. हे तरुण दुसर्याना खुन्नस दाखविण्यासाठी व एखादे कृत्य करण्याआधी इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप, फेसबुक या माध्यमांवर प्रथम स्टेट्स किंवा स्टोअरी ठेवत असल्याची परिसरात चर्चा आहे.