Vikas Lavande Arrested Pudhari
पुणे

Vikas Lavande Arrested: वारकऱ्यांवरील वक्तव्य भोवलं; विकास लवांडेंना पोलिसांनी केली अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Vikas Lavande Arrested: वारकरी संप्रदायाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Vikas Lavande Arrested: वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते विकास लवांडे यांच्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर वाघोली पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना, लवांडे यांच्या अटकेने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं दिसत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

वारकरी संप्रदायात ‘घुसखोरी’ होत असल्याचा दावा विकास लवांडे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी येरवडा येथील नलिनी आशिष वायाळ यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लवांडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना 20 मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याचवेळी तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

न्यायालयात काय घडलं?

तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आल्याचं सांगितलं जात आहे. लवांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जात स्वतःविरोधातील पूर्वीचे चार गुन्हे नमूद न केल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर उपस्थित केला.

सरकारी वकिलांनी ही माहिती लपवण्यात आल्याचा दावा करत अंतरिम संरक्षण रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे वाढला वाद

काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी कथित ‘घुसखोरी केलेल्या वारकऱ्यांची’ यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वादातूनच त्यांच्यावर आळंदी परिसरात शाईफेक झाल्याची घटना घडली होती.

9 मे रोजी लोणी काळभोर परिसरात लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर पिस्तूल दाखवून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

राजकीय वातावरण तापणार?

लवांडे यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पक्षाकडून ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला जात आहे. काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाघोली पोलिस ठाण्याबाहेर जमण्याचं आवाहन केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांकडून अटकेमागचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नसून, या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर आणि राजकीय घडामोड घडते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी : विकास लवांडे

विकास लवांडे म्हणाले, माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट आहेत. वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले. मी घरी नव्हतो.

कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला. कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा माझा सवाल आहे. पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे. कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे. कायदा हातात घेणारा माणूस नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT