पुणे: वारकरी संप्रदाय, हिंदू संत- महंत आणि धार्मिक व्यक्तींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे. लवांडे यांना अटकेनंतर शुक्रवारी (दि. 22) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
लवांडे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांच्या वतीने त्यांना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यास बचाव पक्षाच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांनी विरोध करीत न्यायालयात अर्ज सादर केला.
ही अटक बेकायदा असल्याचा दावा करत, तसे सिद्ध झाल्यास संबंधित न्यायाधीशांनी आरोपीला तत्काळ जामीन द्यावा, अशी मागणी अर्जातून करण्यात आली. लवांडेला पोलिस कोठडी दिल्यास संबंधित न्यायाधीश आणि तपासी अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने विभागीय चौकशी करावी, अशीही विनंती करण्यात आली.
यानंतर न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचा अहवाल फेटाळून लावत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, जामीन अर्जावर तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांचे म्हणणे सादर होऊ न शकल्याने जामीन अर्जावरील पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही.शनिवार आणि रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने हे प्रकरण सोमवारी ठेवल्याचे ॲड. पवार यांनी सांगितले.
‘नजरचूक’ की वर्दीच्या नावाखाली गुंडगिरी?
विकास लवांडे यांच्यावर 8 मे रोजी वाघोली पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. लवांडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्यावर जुने गुन्हे प्रलंबित असल्याचा दावा न्यायालयात केला.
2017 मध्ये लवांडे यांनी नथुराम गोडसेच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यात निर्देाष सुटले असतानाही लवांडे यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, या हेतूने पोलिसांनी न्यायालयात 32/17 ऐवजी गुन्हा क्रमांक 33/17 सादर केला.
हा गुन्हा एका दुसऱ्याच आरोपीचा होता. तो गुन्हा लवांडे यांच्या माथी मारून पोलिसांनी न्यायालयाच्या डोळ्यांत धूळ फेकली. या गंभीर फसवणुकीविरोधात विकास लवांडे आणि त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करून पोलिसांचे पितळ उघडे पाडले.
वाघोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड आणि पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्याबाबत अर्ज केला आहे. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर न्यायालयाने 30 मेपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
...काय आहे प्रकरण?
याप्रकरणी नलिनी वायाळ यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 29 एप्रिल रोजी यूट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील संत, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींना ‘घुसखोर’ संबोधत वादग््रास्त वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादित नमूद केले आहे.
त्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 196 (1) (अ), 299 आणि 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने लवांडे यांना दिलेले अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले. दरम्यान, गुरुवारी (दि.21) लवांडे यांना अटक करण्यात आली.