Pune Politics: पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे हेच असल्याचे स्पष्ट झाल्याने उमेदवारासंदर्भात पसरविण्यात येणार संभ्रम यामुळे दूर झाला आहे. संभाजी झेंडे यांनी शिवसेना तसेच भाजपच्या नेत्यांचे फोटो, पक्षचिन्ह आणि नाव वापरू नये, असे दोन्ही पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
दिवे (ढुमेवाडी) येथे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला. या वेळी भाजप प्रभारी सी. टी. रवी, केंद्रीय निरीक्षक संजय मिस्कीन, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, पंडित मोडक, हवेलीचे तालुकाध्यक्ष संदीप हरपळे, पुरंदर तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, शेखर वढणे, सासवड शहर अध्यक्ष संतोष जगताप, जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी भाजप प्रभारी सी. टी. रवी म्हणाले, भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आपला नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेनेसोबत म्हणजेच विजय शिवतारे यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार झेंडे यांनी संभ्रम निर्माण करू नये. कार्यकर्त्यांनी गावागावात याबाबत जनजागृती करून शिवतारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे.
संभाजी झेंडे यांनी चिन्ह, नाव, नेत्यांचा फोटो वापरू नये : जगताप
झेंडे यांच्या प्रचार साहित्यांवर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचे फोटो, चिन्ह आणि नाव छापल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप आणि शिवसेनेचे हरिभाऊ लोळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. झेंडे यांनी यापुढे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचे फोटो, चिन्ह आणि नाव वापरल्यास गुन्हे दाखल करावेत, असे निवडणूक निर्णय अधिकार्यांना कळवले आहे.
झेंडे यांनी नवाब मलिकांचा आदर्श घ्यावा : म्हस्के
नवाब मलिक यांनी स्वतः घोषित करून मी महायुतीचा उमेदवार नसून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे, हे मर्दासारखे जाहीर केले. झेंडे यांच्यावर वाईट वेळ आलेली असून त्यांना सेना-भाजपच्या लोकांना न विचारता त्यांचे नाव आणि फोटो वापरावे लागत आहेत. त्यांनी नवाब मलिक यांचा आदर्श घेऊन मैदानात यावे, असे माजी सभापती अतुल म्हस्के म्हणाले.