पुणे

Pune News : शासकीय बँकिंग व्यवहारासाठी राज्य बँकेची गुणवत्तेवर निवड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शासकीय कार्यालयाच्या बँकिंगविषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधींची गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस राज्य सरकारने पात्र ठरविले आहे. याकामी राज्य बँकेची झालेली निवड ही गुणवत्तेवर असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी कळविली आहे.

राज्य सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त निधींची गुंतवणूक बँकांमधून करताना प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया व तिच्या असोसिएट बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि किमान चार हजार कोटी रुपयांचे नक्त मूल्य (नेटवर्थ) असलेल्या इतर बँका पात्र ठरत होत्या. परंतु आजपर्यंत देशातील कोणत्याही सहकारी बँकेने 4 हजार कोटींइतक्या नक्त मूल्यांचा टप्पा पार न केल्याने त्या शासनाच्या गुंतवणुकीसाठी पात्र ठरत नव्हत्या. राज्य सहकारी बँकेने 30 जून 2023 रोजी हा टप्पा पार केल्याने ती देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे.

राज्य शासनाचे पात्रतेचे सर्व निकष तसेच रिझर्व्ह बँकेचे आर्थिक सक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केल्याने राज्य शासनाच्या अतिरिक्त निधींची गुंतवणूक राज्य बँकेमध्ये होण्यासाठी बँकेने शासनाकडे विनंती करीत पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.19) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT