Congress  pudhari photo
पुणे

MVA Internal Dispute: राष्ट्रवादीच्या माघारीवर काँग्रेसचा संताप;‌ ‘हा विश्वासघात, आता स्वबळाचा विचार‌’

‌’मोठ्या भावाची भूमिका घेतली, बदल्यात विश्वासघात मिळाला‌’ : काँग्रेससचा हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवाराने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांचा मार्ग सुकर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव नाराजी व्यक्त करत हा काँग्रेसस पक्ष आणि मतदारांचा विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे.

जगताप म्हणाले की, भाजप आणि महायुती सरकारविरोधात एकसंघपणे लढण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीची तयारी सुरू होती. पुणे मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याने या जागेवर पक्षाने नैसर्गिक दावा सांगितला होता. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस नेतृत्वाशीही सकारात्मक चर्चा झाली होती.

मात्र, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुणे आणि सातारा या दोन जागांवर आग्रही भूमिका घेतली. महाविकास आघाडीची एकजूट कायम राहावी आणि भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळावे, या भूमिकेतून काँग्रेसने पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात तो मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेससने आग्रहाने उमेदवारी घेतल्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हा काँग््रेासचा विश्वासघात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेस या निवडणुकीत भाजपविरोधात ताकदीने लढण्यास तयार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसमोर शरणागती पत्करल्याचा आरोपही जगताप यांनी केला.

पुढील रणनीतीबाबत लवकरच निर्णय

या घडामोडींमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव नाराजी निर्माण झाली असून, भविष्यात पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्याचा विचार करेल, असा इशाराही त्यांनी दिला. पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी पुढील राजकीय रणनीतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील परस्पर विश्वास आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT