ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे आज निधन झाले Pudhari News Network
पुणे

ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन

Veena Dev : वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आपल्या लेखणीने मराठी वाचकांच्या मनात वेगळा ठसा उमविणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा विजय देव यांचे मंगळवारी (दि. २९) निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. वीणा देव या दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री आहेत.

डॉ. वीणा देव यांनी साहित्याचे वेगवेगळे प्रकार हाताळले. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केले. येथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डीही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली.

'कधीकधी', 'परतोनी पाहे', 'स्त्रीरंग', 'विभ्रम', 'स्वान्सीचे दिवस' हे त्यांचे लेखसंग्रह गाजले. 'स्मरणे गोनिदांची' हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तकेही प्रकाशित झाली. डॉ. देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या 'आशक मस्त फकीर' या व्यक्तिचित्रास राज्य सरकारकडून उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच, सरकारच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना वीणा मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. देव या ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली . मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे. १९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. तसेच गो.नी.दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी डॉ. वीणा देव या पती प्रा. विजय देव यांच्या मदतीने मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो.नी.दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन असे विविध उपक्रम राबवित. त्यांच्या मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो.नी.दा. यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT