पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगाव मतदार संघातील 32 हजार 366 मतदारांची दुबार नावे असल्याचा दावा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने या मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावतीकरण आणि पुररिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.
त्यानुसार पुरंदर विधानसभा मतदारसंघात 32 हजारांहून अधिक नावे सांगली जिह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघातील असल्याबाबत शिवतारे यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सांगली आणि पुणे जिह्याच्या धर्तीवर स्वतंत्र पथक स्थापन करून नावे कमी करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. परंतु, यातील सर्व नावे वगळली जाण्याची शक्यता नसून, मुदतीच्या आत जेवढी नावे वगळली जातील तेवढीच नावे कमी करण्यात येईल, असे देखील जिल्हा निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर म्हणाल्या, 'निवडणूक विभागातर्फे पुण्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रांत अधिकारी, तहसीलदार, मतदान नोंदणी अधिकारी आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील संबंधित अधिकार्यांचे विशेष स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने दुबार असलेल्या नावांची तपासणी करून संबंधित मतदारांशी संपर्क साधून कोणत्या ठिकाणचे नाव वगळायचे याबाबत विचारणा करून नाव वगळण्याची कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
मतदार याद्या पुनरीक्षण उपक्रमाअंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी असून 17 जानेवारी रोजी याद्या छपाई करून 22 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार पुरंदर मतदार संघातील यादीबाबत उशिरा तक्रार आली असून 32 हजार 366 दुबार नावे रद्द करण्यासाठी प्रत्येक मतदाराला संपर्क साधून एकच मतदार संघातील नाव निश्चित करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला, तरच ही नावे वगळली जाऊ शकतात. त्यासाठी दीर्घ कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा